PCMC : एमआयडीसी परिसरात अजितदादांचे स्मारक उभारावे – संदीप बेलसरे

एमआयडीसी परिसराला ‘अजितनगर’ नाव देण्याची मागणी – सुरेश म्हेत्रे

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) :पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरातील लघुउद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांनी नेहमीच सकारात्मक आणि तत्पर भूमिका घेतली. वीज, पाणी, रस्ते, वाहतूक, मिळकत कर, संघटनेला जागा उपलब्ध करून देणे तसेच लघुउद्योजकांचे पुनर्वसन यासारख्या अनेक प्रश्नांमध्ये त्यांनी वेळोवेळी हस्तक्षेप करून ठोस निर्णय घेतले. त्यांच्या या योगदानाची आठवण कायम राहावी यासाठी पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसरात स्व. अजितदादा पवार यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केली.

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने सोमवारी मोशी प्राधिकरण सेक्टर ४ येथील पर्ल बँक्वेट हॉलमध्ये स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना संदीप बेलसरे म्हणाले की, “लघुउद्योजकांच्या प्रश्नांसाठी कायम सकारात्मक भूमिका घेणारे नेतृत्व आपण गमावले आहे. त्यांच्या स्मृती पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठराव्यात, यासाठी महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि राज्य सरकारकडे स्मारक उभारणीसाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येईल. हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.”


उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार व त्यांच्या सोबत विमानात असलेल्या इतर चार व्यक्तींचे २८ फेब्रुवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.

यावेळी सुरेश म्हेत्रे यांनी एमआयडीसी परिसराला ‘अजितनगर’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. ते म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योजकांच्या दृष्टीने अजितदादा पवार हे लोहपुरुष होते. त्यांच्या कार्याची आठवण जपण्यासाठी येथे एखादा विकासात्मक प्रकल्प किंवा नामकरण झाले पाहिजे.”

संजय आहेर यांनी सांगितले की, “पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेसोबतच राज्यातील सर्वच लघुउद्योजकांना अजितदादा पवार यांनी कायम पाठबळ दिले. एमआयडीसी परिसराला ‘अजितनगर’ नाव देण्यासाठी संघटनेने पुढाकार घ्यावा.”

हर्षल थोरवे म्हणाले, “सर्वसामान्यांपासून उद्योगपतींपर्यंत प्रत्येकाच्या मनात घर केलेला आपला माणूस आपण गमावला आहे.”

या श्रद्धांजली सभेस अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष विनोद नाणेकर, सचिव जयंत कड, प्रसिद्धी प्रमुख विजय खळदकर तसेच संचालक संजय सातव, विनोद मित्तल, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, अतुल इनामदार, सचिन आदक, तात्या सपकाळ, सुरेश म्हेत्रे, संजय भोसले, माणिक पडवळ, बशीरभाई तरसगार यांच्यासह अनेक लघुउद्योजक उपस्थित होते.

दोन मिनिटे शांत उभे राहून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व पसायदानाने सभेचा समारोप करण्यात आला.


थोडे नवीन जरा जुने