पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनासाठी खरेदी केलेली तीन चाकी फिरती ई-वाहने गेल्या दोन महिन्यांपासून दिव्यांग भवनाच्या पार्किंगमध्ये वापराविना पडून असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. डिसेंबर महिन्यापासून वाहन वाटप रखडले असून अद्याप एकाही पात्र लाभार्थ्याला वाहन देण्यात आलेले नाही. यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त व महापौर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, लाखो रुपयांचा खर्च करून खरेदी केलेली वाहने धूळ खात पडून राहणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे व असंवेदनशीलतेचे द्योतक आहे. दिव्यांग नागरिकांना रोजगार, व्यवसाय, शिक्षण व दैनंदिन प्रवास सुलभ व्हावा या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली होती. ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमात वाहन वाटपाची घोषणा मोठ्या थाटात करण्यात आली; मात्र आरटीओच्या तांत्रिक कारणांचा आधार घेत वाटप प्रक्रिया अचानक थांबविण्यात आली.
सध्या ई-वाहनांवर धूळ साचलेली असून काही वाहनांचे टायर पंक्चर झाल्याचेही निदर्शनास आले आहे. ही बाब केवळ दुर्लक्षाची नसून दिव्यांग बांधवांच्या हक्कांवर अन्याय करणारी आहे. प्रशासनाने आरटीओ विभागाशी तातडीने समन्वय साधून सर्व तांत्रिक अडचणी दूर कराव्यात व रखडलेले ई-वाहन वाटप त्वरित सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने मनसे स्टाईलने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे. या प्रकरणात कोणतीही टाळाटाळ किंवा वेळकाढूपणा सहन केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनसेच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त महापौर रवी लांडगे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी मनसे शहर सचिव रुपेश पटेकर, उपशहराध्यक्ष बाळा दानवले, विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, प्रबुद्ध कांबळे व प्रविण कांबळे आदी उपस्थित होते.
