पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) - “मोरया हॉस्पिटलच्या उभारणीत मामनचंद आगरवाल यांचे योगदान इतके मूलभूत आणि निर्णायक होते की, ते नसते तर आज मोरया हॉस्पिटलची इमारत उभी राहिलीच नसती,” असे भावनिक व ठाम प्रतिपादन मोरया हॉस्पिटलचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी केले. निगडी प्राधिकरण येथील मामनचंद आगरवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक, सद्गुरु जंगली महाराज बँकेचे संस्थापक अध्यक्ष तसेच नामवंत उद्योजक असलेल्या मामनचंद आगरवाल यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कोणतेही धार्मिक कर्मकांड न करता सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. त्यांच्या प्रगतिशील विचारांनुसार मोरया हॉस्पिटलला आर्थिक मदत देत सेवा व माणुसकीच्या माध्यमातून त्यांना आगळीवेगळी आदरांजली वाहण्यात आली.
डॉ. अविनाश वाचासुंदर पुढे म्हणाले, “१९८२ पासून मामनचंद आगरवाल यांचा मोरया हॉस्पिटलशी अतूट संबंध होता. आम्ही सर्व डॉक्टर सेवाभावी वृत्तीने काम करत आहोत, या विश्वासावर त्यांनी जंगली महाराज बँकेच्या माध्यमातून हॉस्पिटलसाठी कर्ज उपलब्ध करून दिले. कोणताही मान-सन्मान, पद किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता त्यांनी संस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर भक्कम पाठबळ दिले.”
या कार्यक्रमास मोरया हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अरविंद पंडित, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश बोराडे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मुकुंद डोग्गीकर, पॅथॉलॉजिस्ट डॉ. ज्योती कोराडे, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. नीलिमा अमृते, आयुर्वेद विभागप्रमुख डॉ. वेंकटेश धर्माधिकारी, आयुर्वेदाचार्य डॉ. उदय जोशी, ओरल सर्जन डॉ. अमित नेमाने यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संजय कुलकर्णी, कामगार प्रतिनिधी व विश्वस्त भगवान तांबे, हॉस्पिटल व्यवस्थापिका सारिका मोरे उपस्थित होते.
यावेळी अध्यात्मिक गुरु सूरजभान, तसेच मामनचंद आगरवाल यांच्या पत्नी गंगादेवी एम. आगरवाल, भाऊ चंद्रभान सी. आगरवाल (गर्ग), भावजय निर्मला चंद्रभान आगरवाल गर्ग, लता रामकुमार आगरवाल, पुत्र सुरेश व राजेश मामनचंद आगरवाल, कन्या उषा मोहन गुप्ता, पुष्पा जितेंद्र आगरवाल, मीना सोमेश गुप्ता यांच्यासह संपूर्ण आगरवाल परिवार उपस्थित होता.
मामनचंद आगरवाल यांचे कार्य केवळ सामाजिक व आरोग्य क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. ते ‘सत्संग भवन – जिंदराम गुरु का रहानी आश्रम’चे संस्थापक होते. अध्यात्म, सद्विचार व जीवनमूल्यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर तन, मन व धन अर्पण केले. समाजातील सामान्य माणसात विवेक, आत्मचिंतन व माणुसकीची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले.
कार्यक्रमात मोरया हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला तसेच हॉस्पिटलसाठी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. अध्यात्मिक गुरु सूरजभान यांच्या मार्गदर्शनाखाली भजन व सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मोरया हॉस्पिटलच्या उभारणीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीपती शास्त्री व ज्येष्ठ प्रचारक तात्या बापट यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. त्यांच्या विचारांनी सेवाभावी रुग्णालय उभारण्याचा संकल्प अधिक दृढ झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
कर्मकांड व अंधश्रद्धांना कधीही थारा न देणारे मामनचंद आगरवाल हे माणुसकी, विवेक व समाजहित यांना सर्वोच्च स्थान देणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कोणतेही धार्मिक विधी न करता सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.
राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक व आर्थिक क्षेत्रात ठसा उमटवणारे मामनचंद आगरवाल हे केवळ यशस्वी उद्योजक नव्हते, तर विचारांनी व कृतीने समाज घडवणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जीवनकार्याचा वारसा पुढे नेणारा हा प्रथम स्मृतीदिन कार्यक्रम उपस्थितांच्या मनाला भावून गेला.
