रुग्णाच्या मृत्यूबाबत अधिवेशनात प्रश्न मांडणार - आमदार जगताप
डॉक्टरांची कमी संख्या, सोलर सिस्टिम, एमआरआय सेंटर बंद
अस्वच्छता, मोडकळीस आलेली आसन व्यवस्था, घाणीचे साम्राज्यामुळे आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटर वर ; आमदार जगताप यांचा संताप
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : सांगवी जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेवरुन बुधवारी आमदार शंकर जगताप यांनी रुग्णालय प्रशासनाची चांगली झाडाझडती घेतली. "आरोग्य व्यवस्थेची अक्षरशः हेळसांड मांडली आहे''. अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. डॉक्टरांची कमी संख्या, सोलर सिस्टिम कार्यान्वित नसणे, एमआरआय सेंटर बंद असल्याबद्दल रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.
सांगवी जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाबाबत बुधवारी आमदार शंकर जगताप यांनी अचानक पाहणी दौरा दरम्यान आमदार जगताप म्हणाले, हे रुग्णालय पुणे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या केंद्रस्थानी आहे. अनेक प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मोफत दरात उपलब्ध असल्यामुळे उपचारांसाठी जिल्ह्यातून या ठिकाणी रुग्णांची मोठी गर्दी असते. मात्र अनेक दिवसांपासून या रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबतच्या तक्रारी केल्या जात होत्या. या संदर्भात वारंवार नागरिकांची निवेदने येत होती. त्या अनुषंगाने आज अचानक रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयाला भेट दिल्यानंतर नागरिकांनी केलेल्या तक्रारी पेक्षाही विदारक अवस्था दिसून आली. ठिकठिकाणी अस्वच्छता, मोडकळीस आलेली आसन व्यवस्था, घाणीचे साम्राज्य, रुग्णालयाच्या आवारात सांडलेले सांडपाणी अशा अनेक तक्रारी निदर्शनास आल्या मुख्य म्हणजे डॉक्टरांच्या उपस्थितीची संख्या देखील नियमाप्रमाणे नव्हती असे आमदार जगताप यांनी सांगितले.
यावेळी अति दक्षता विभाग, एक्स-रे सेंटर, एम आर आय सेंटर या ठिकाणी पाहणी केली असता एम आर आय सेंटर बंद असल्याचे दिसून आले तर आयसीयू कक्षा साठी प्रचंड वेटिंग देखील दिसून आली. बऱ्याचदा रुग्णांना सिविल हॉस्पिटल मधून ससून रुग्णालयात रेफर केले जाते अशा तक्रारी देखील नागरिकांनी केल्या डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालयातून अनेक पेशंट इतरत्र पाठवले जातात असे देखील यावेळी निदर्शनास आले.
रुग्णालयातील “शवागार” बंद ; आरोग्यवस्था गॅसवर
या रुग्णालयातील “शवागार” बंद आहे. याशिवाय सोलर सिस्टिम बसवण्यात आलेली आहे. मात्र त्याचे नेट मीटरिंग केलेले नसल्यामुळे अजूनही या प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला नाही. एकीकडे सांगवी जिल्हा रुग्णालयात अनेक सुविधांची वाताहत आहे. याही पलीकडे येथील आरोग्य सेवक असलेले डॉक्टर, नर्स, विविध कर्मचारी या सर्वांनीच आरोग्य व्यवस्था गॅसवर ठेवण्याचे काम केले असल्याचे आमदार म्हणाले. अति दक्षता विभागात देखील कोणतेही सुरक्षेचे नियम पाळले जात नव्हते. बाहेरून आलेले कर्मचारी, पेशंटचे रुग्ण, अगदी डॉक्टर सुद्धा चप्पल बूट घालून फिरत असल्याचे यावेळी निदर्शनास आले.
---------------------------------------------
अधिवेशनात लक्ष वेधणार
या रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जपणामुळे १८ जानेवारी २०२६ रोजी सुमित सोनवणे या ३० वर्षे तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सुमितला त्रास होत असतानाही त्याला नॉर्मल असल्याचे सांगितले गेले. प्राथमिक जुजबी उपचार करून घरी पाठवण्यात आले. यानंतर घरी सदर रुग्णाला प्रचंड त्रास झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला . या दुर्दैवी घटनेबद्दल राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथे होणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे असे देखील यावेळी जगताप यांनी सांगितले.
------------------------------
पुणे, पिंपरी चिंचवड तसेच लगतच्या अनेक ग्रामीण भागातून सांगवी जिल्हा रुग्णालयात अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असलेल्या या रुग्णालयामध्ये रुग्णांना तात्काळ उपचार मिळणे अपेक्षित आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आरोग्य सेवेला बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे . त्या माध्यमातून अनेक योजना, जिल्हा रुग्णालय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रुग्णालयांना बळकट करण्याचे काम विविध स्तरातून सुरू आहे. कोणताही रुग्ण उपचाराविना परत जाऊ नये हा भाजपाचा प्राधान्यक्रम आहे. सांगवी जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाबाबत अनेक अडचणी, तक्रारी माझ्यापर्यंत आल्या. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी आज अचानक रुग्णालयाची पाहणी केली. यामध्ये सुधारणा करण्याबाबत डॉक्टर,कर्मचारी सर्वांना सूचना केल्या आहेत. दरम्यान या रुग्णालयातील एका रुग्णाच्या मृत्यूच्या घटनेबाबत मुंबई अधिवेशनात राज्य शासनाचे लक्ष वेधणार आहे.
शंकर जगताप
आमदार पिंपरी चिंचवड शहर.

