!-- afp header code starts here --> PCMC : वुई टुगेदर फाउंडेशन, चिंचवडच्या ज्येष्ठ महिला सभासदांची आनंददायी सहल

PCMC : वुई टुगेदर फाउंडेशन, चिंचवडच्या ज्येष्ठ महिला सभासदांची आनंददायी सहल


पिंपरी चिंचवड (सलीम सय्यद) : वुई टुगेदर फाउंडेशन, चिंचवड या संस्थेच्या ज्येष्ठ महिला सभासद भगिनींसाठी कुसगाव, मारुंजी येथील स्नेह रिसॉर्ट येथे एक दिवसीय आनंददायी सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीत एकूण १२ ज्येष्ठ महिला सभासद भगिनी सहभागी झाल्या होत्या.

स्नेह रिसॉर्टच्या निसर्गरम्य वातावरणात सर्व महिला भगिनींनी मनमुराद आनंद लुटला. यावेळी छायाचित्रणाचाही आनंद घेण्यात आला. रिसॉर्टतर्फे ढोल-ताशांच्या गजरात सहलीचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. ढोलाच्या तालावर महिलांनी उत्स्फूर्तपणे नृत्य केले. तसेच रेन डान्समध्ये भिजण्याचा आनंदही सर्वांनी घेतला.

उत्तम नाश्ता, चहा व स्वादिष्ट जेवण हे स्नेह रिसॉर्टचे विशेष आकर्षण ठरले. निसर्गरम्य परिसर व समोर दिसणारा कासारसाई धरणाचा सुंदर जलाशय मनाला प्रसन्नता देणारा होता. याशिवाय मेहंदी, पपेट शो, हुरडा पार्टी, राजस्थानी नृत्य, फिक्सल वर्ल्ड, थ्री-डी शो अशा विविध उपक्रमांचा महिलांनी मनसोक्त आनंद घेतला. वेळ कसा निघून गेला हे कोणाच्याही लक्षात आले नाही.

दैनंदिन घरगुती कामातून असा एखादा सोनेरी दिवस आनंदात घालवणे किती महत्त्वाचे आहे, अशा भावना सर्व भगिनींनी व्यक्त केल्या.

या सहलीचे आयोजन संस्थेच्या महिला समन्वय समितीच्या अध्यक्षा सौ. अपर्णा कुलकर्णी व विजया मराठे-दाते यांनी केले. सहलीत सरिता कुलकर्णी, मीना मांडके, लता शिंदे, सबाह सय्यद, उज्वला जगताप, शिल्पा चक्रे, वासंती काळे, शारदा गुरव, अनुजा खोडके व सुवर्णा पोरे यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

भविष्यात संस्थेतर्फे अशा अनेक सहली आयोजित केल्या जातील व त्यात सर्व महिलांनी सहभागी व्हावे, अशी भावना संस्थेचे अध्यक्ष माननीय मधुकर बच्चे यांनी व्यक्त केली. सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे श्री. सुरेंद्र जगताप व श्री. अनिल शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले.


थोडे नवीन जरा जुने