PCMC : संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी जयंतीनिमित्त पिंपरी–चिंचवडमध्ये भक्तिभावपूर्ण धार्मिक सोहळा


परमरहस्य ग्रंथ सामूहिक पारायण, रुद्राभिषेक व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता

पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) : शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, शिवा महिला आघाडी व शिव सांप्रदायिक भजनी मंडळ, पिंपरी–चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य व भक्तिमय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. ८ फेब्रुवारी २०२६) रोजी करण्यात आले. शिवशंभो फाउंडेशन, महादेव मंदिर, शाहूनगर, चिंचवड (पुणे) येथे हा सोहळा अत्यंत मंगल व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी विधिवत रुद्राभिषेकाने करण्यात आली. त्यानंतर संत मन्मथ स्वामी महाराज यांनी रचलेल्या अत्यंत महत्त्वाच्या “परमरहस्य” ग्रंथाचे सामूहिक पारायण मोठ्या श्रद्धेने व एकाग्रतेने संपन्न झाले. या पारायणात वीरशैव लिंगायत समाजातील स्त्री–पुरुष, युवक–युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

याप्रसंगी प्रसिद्ध प्रवचनकार शि. भ. प. शिवलिंग पाटील यांनी संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी महाराज यांच्या जीवनकार्यावर तसेच परमरहस्य ग्रंथाच्या तात्त्विक व आध्यात्मिक महत्त्वावर सखोल मार्गदर्शन केले. आत्मशुद्धी, भक्ती, कर्मयोग व समाजप्रबोधनाचा मार्ग या ग्रंथातून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या धावपळीच्या जीवनात परमरहस्य ग्रंथ मानवाला अंतर्मुख करून सकारात्मक परिवर्तनाची दिशा देतो, असेही त्यांनी सांगितले.

दुपारी मंगल महाआरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. महाप्रसादाचे आयोजन ओमकार चिमेगावे व सूर्यकांत हिप्परगे यांनी केले.

पारायण व रुद्राभिषेकासाठी इच्छुक भाविकांसाठी सौ. शीलाताई आनपाण, सौ. निर्मलाताई डांगे, सौ. सुवर्णमाला पाटील, सौ. कल्पनाताई गुलवे, सौ. श्रद्धाताई मोरखंडे, सौ. सुरेखाताई स्वामी, सौ. सुरेखाताई बुङगे व सौ. सुनिताई विभते यांनी उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

यावेळी मा. श्री उमाकांत शेटे (राष्ट्रीय सरचिटणीस, शिवा संघटना) यांनी संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. अशा धार्मिक व वैचारिक कार्यक्रमांतून समाजात संघटन, प्रबोधन व परिवर्तनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचतो, असे त्यांनी सांगितले. परिसरातील वीरशैव लिंगायत समाजबांधवांची मोठ्या संख्येतील उपस्थिती हीच या कार्यक्रमाची खरी यशस्विता असल्याचे त्यांनी नमूद केले.

संपूर्ण कार्यक्रम भक्तिरस, शिस्तबद्ध नियोजन व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा ठरला.

प्रसंगी शिवानंद चौगुले, अनिल बोचरे, संतोष नुचे, कपिलेश्वर ददापुरे व वीरभद्र मुतंगे यांचीही विशेष उपस्थिती लाभली.


थोडे नवीन जरा जुने