लाळ खुरकत रोग निर्मूलनासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय


पशुसंवर्धन विभागाचे पशुपालकांना आवाहन

मुंबई (वर्षा चव्हाण) : गाय, म्हैस, शेळी व मेंढ्यांमध्ये आढळणारा लाळ खुरकत हा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग असून, त्याचा पशुधन उत्पादनक्षमतेवर तसेच दूध व मांस निर्यातीवर गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर लाळ खुरकत रोगाच्या नियंत्रणासाठी व संपूर्ण निर्मूलनासाठी लसीकरण हाच सर्वात प्रभावी उपाय असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (NADCP) सन 2030 पर्यंत लाळ खुरकत (FMD) व सांसर्गिक गर्भपात (Brucellosis) हे दोन प्रमुख पशुरोग लसीकरणाद्वारे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात नियमित सहा महिन्यांच्या अंतराने लसीकरण मोहिमा राबविण्यात येत आहेत.

राज्यात 14 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत लाळ खुरकत लसीकरण फेरी–7 यशस्वीरीत्या पार पडली. या फेरीत एकूण 159 लक्ष गो व म्हैस वर्गीय पशुधनांपैकी 153 लक्ष पशुधनांचे लसीकरण करण्यात आले असून, ही बाब रोगनियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र रोगाचे संपूर्ण निर्मूलन साध्य करण्यासाठी प्रत्येक पशुधनाचे दर सहा महिन्यांनी लसीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.


याच अनुषंगाने 13 फेब्रुवारी ते 29 मार्च 2026 या कालावधीत लाळ खुरकत लसीकरण फेरी–8 राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी आवश्यक लस व इतर साधनसामग्रीचा पुरवठा केंद्र शासनामार्फत करण्यात आला असून, मोहिमेची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या मानक कार्यप्रणालीनुसार केली जाणार आहे.

या लसीकरण मोहिमेत पंचायती राज संस्था, शहरी स्थानिक संस्था, सहकारी दुग्ध संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी पशुवैद्यक तसेच पशुपालकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून, सर्व स्तरांवरील समन्वयातून मोहिम यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पशुधनाचे आरोग्य जपणे, रोगाचा प्रसार रोखणे आणि पशुपालकांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळणे या उद्देशाने सर्व पशुपालकांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून गो व म्हैस वर्गीय पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. तसेच आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने