नवी दिल्ली (किशोर थोरात) : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि होर्मुज जलडमरूमध्यावर परिणाम होण्याच्या बातम्यांनंतरही भारतात तेल आणि एलपीजी पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. पश्चिम आशियातील परिस्थिती तणावपूर्ण असली तरी सामान्य नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले आहे. देशात कच्चे तेल (क्रूड ऑईल) आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठ्यावर कोणताही तातडीचा धोका नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
60 दिवसांचा तेल साठा उपलब्ध
मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारताकडे सध्या सुमारे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे. यामध्ये कच्चे तेल, तयार पेट्रोलियम उत्पादने आणि स्ट्रॅटेजिक रिझर्व्हचा समावेश आहे. देशाची एकूण साठवण क्षमता जवळपास 74 दिवसांची आहे.
भारत आता केवळ एका किंवा दोन देशांवर अवलंबून नसून, 41 पेक्षा अधिक देशांमधून कच्च्या तेलाची आयात करत आहे. पूर्वी Strait of Hormuz या मार्गावर जास्त अवलंबित्व होते, मात्र आता अमेरिका, कॅनडा आणि ब्राझीलसारख्या देशांकडून वाढलेल्या खरेदीमुळे हे अवलंबित्व कमी झाले आहे. देशातील रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याने पेट्रोल-डिझेल पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही.
एलपीजी पुरवठा पूर्णपणे नियंत्रणात
एलपीजीबाबतही परिस्थिती स्थिर असल्याचे सरकारने सांगितले आहे. देशांतर्गत उत्पादनात सुमारे 40% वाढ करण्यात आली असून, दररोज सुमारे 50,000 मेट्रिक टन एलपीजी उत्पादन होत आहे. हे देशाच्या एकूण गरजेपैकी 60% पेक्षा अधिक आहे.
उर्वरित गरजेसाठी सुमारे 30,000 मेट्रिक टन एलपीजी आयात केली जात आहे. याशिवाय, सुमारे 8 लाख मेट्रिक टन एलपीजीचा पुरवठा आधीच निश्चित करण्यात आला आहे, जो अमेरिका, रशिया आणि ऑस्ट्रेलिया येथून येत आहे.
देशातील एलपीजी इन्फ्रास्ट्रक्चरही मजबूत झाले आहे. सध्या 22 टर्मिनल्सवर गॅस हँडलिंग होत असून, 2014 मध्ये ही संख्या केवळ 11 होती.
सिलेंडर डिलिव्हरीमध्ये अडचण नाही
सरकारी तेल कंपन्यांकडून दररोज 50 लाखांपेक्षा जास्त एलपीजी सिलेंडरची डिलिव्हरी केली जात आहे. अलीकडील तणावाच्या काळात मागणी वाढून 89 लाख सिलेंडर प्रतिदिन इतकी झाली होती, मात्र आता ती पुन्हा सामान्य पातळीवर आली आहे.
तसेच, कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा सुमारे 50% ने वाढवण्यात आला आहे, ज्यामुळे बाजारात तुटवडा किंवा काळाबाजार होण्याची शक्यता कमी झाली आहे.
सरकारचा स्पष्ट संदेश: देशात तेल आणि एलपीजीचा पुरवठा सुरक्षित असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
