दहा वर्षानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यकारणी सत्तापालट – साहित्य संवर्धन आघाडीचे अध्यक्षपदी योगेश सोमण विजयी

 


पुणे : महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात महत्त्वाची मानली जाणारी महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक यंदा अत्यंत उत्साहात पार पडली. या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीने निर्विवाद विजय मिळवत साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय विचारांचा विजय मिळवला असल्याची भावना साहित्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.

या निवडणुकीत अध्यक्षपदी योगेश सोमण यांची निवड झाली असून त्यांच्या नेतृत्वाखाली नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. प्रमुख कार्यवाहपदी स्वाती महाळंक, तर कोषाध्यक्षपदी प्रदीप निफाडकर यांची निवड झाली आहे. स्थानिक कार्यवाह म्हणून सुनील महाजन आणि प्रसाद मिरासदार यांच्यासह इतर सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे.

या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीला मोठ्या प्रमाणात साहित्यिक, अभ्यासक आणि सभासदांचा पाठिंबा मिळाला. गेल्या काही वर्षांत साहित्य क्षेत्रात निर्माण झालेल्या बदलत्या परिस्थितीत मराठी साहित्याची परंपरा जपत आधुनिक काळाशी सुसंगत काम करण्याचा संकल्प या नव्या नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे साहित्यिक, लेखक, कवी तसेच विविध सांस्कृतिक संस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी उपस्थितांनी मराठी साहित्याचा प्रचार-प्रसार, नवोदित लेखकांना संधी आणि डिजिटल माध्यमांतून साहित्याचा विस्तार करण्यासाठी ठोस उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्ष योगेश सोमण यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “महाराष्ट्र साहित्य परिषद ही केवळ संस्था नसून मराठी संस्कृती आणि साहित्याचा महत्त्वाचा वारसा आहे. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून साहित्यिक चळवळीला नवे बळ देण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

नव्या कार्यकारिणीच्या निवडीमुळे मराठी साहित्य क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होईल, अशी आशा साहित्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.

वार्ताहर : शिवानंद चौगुले

महाराष्ट्र जनभूमी न्यूज पोर्टल

थोडे नवीन जरा जुने