जीवनविद्या पिंपरी ज्ञानसाधना केंद्राचा उपक्रम उत्साहात
चिखली (शिवानंद चौगुले) : International Women's Day निमित्त जीवनविद्या पिंपरी ज्ञानसाधना केंद्राच्या वतीने महात्मा फुलेनगर, चिखली येथील Ganesh Mandir परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षदिंडी, महिलांचा सत्कार आणि प्रेरणादायी व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांमुळे हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात संत परंपरेच्या स्मरणाने झाली. Sant Dnyaneshwar माऊलींच्या उपासना यज्ञाने कार्यक्रमाला आध्यात्मिक सुरुवात झाली. त्यानंतर महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात अनेक माता-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली तपासणी करून घेतली.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी तुळशीची रोपे हातात घेऊन वृक्षदिंडी काढण्यात आली. परिसरात हरित संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. या माध्यमातून “निसर्ग संवर्धन हीच खरी सेवा” असा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत यशस्वी ठरलेल्या महिलांचा आणि उद्योजकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. समाजात सकारात्मक कार्य करणाऱ्या महिलांचे कौतुक करत त्यांना स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या उद्योजिका Madhu Bhagwat यांनी “उद्योग हाच योग” या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. महिलांनी आत्मविश्वास, चिकाटी आणि कौशल्याच्या जोरावर उद्योजकतेकडे वळावे, आर्थिक स्वावलंबन प्राप्त करावे आणि समाजात आदर्श निर्माण करावा, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनातून उपस्थित महिलांना नवी प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमादरम्यान ‘सुख-संवाद’ या सत्रात महिलांनी परस्पर अनुभवांची देवाणघेवाण करत समाजातील विविध प्रश्नांवर विचार मांडले. या संवादातून महिलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जीवनविद्या पिंपरी ज्ञानसाधना केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
महिला सक्षमीकरण, आरोग्य जागरूकता आणि पर्यावरण संवर्धन या तिन्ही विषयांना स्पर्श करणारा हा उपक्रम परिसरातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

.jpeg)