!-- afp header code starts here --> जागतिक महिला दिनानिमित्त स्वच्छता दूत महिलांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन

जागतिक महिला दिनानिमित्त स्वच्छता दूत महिलांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन


पिंपळे गुरव (क्रांतिकुमार कडूलकर) : जागतिक महिला दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने रस्ते स्वच्छता करणाऱ्या महिला स्वच्छता दूतांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम पिंपळे गुरव येथील कै. काळूराम जगताप जलतरण हॉल येथे पार पडला.


पिंपळे गुरव व नवी सांगवी परिसरातील पालिकेकडे ठेकेदारांमार्फत काम करणाऱ्या सुमारे ७० महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी पूजा हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप नन्नवरे आणि डॉ. शिवानी घुमरे–आरकर यांनी महिलांची दात व आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.


मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, “जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, विश्वशक्तीचे नाव आहे नारी.” आज स्त्रिया शेतीपासून अंतराळापर्यंत प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यातही महिलांचा मोठा वाटा असून त्या इतरांच्या आरोग्याची काळजी घेत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिला दिनानिमित्त हा उपक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.


पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने म्हणाले की, समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून ही संस्था वंचित व कष्टकरी वर्गासाठी सातत्याने स्तुत्य उपक्रम राबवत असून पालिकेच्या सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेत आहे.


आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे यांनी सांगितले की, शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्यात महिला स्वच्छता दूतांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच नागरिकांचे आरोग्य चांगले राहते आणि शहर स्वच्छ राहते. त्यांच्यामुळेच स्वच्छता मोहिमेत शहराला चांगले स्थान मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.


डॉ. शिवानी घुमरे–आरकर यांनी सांगितले की, समाजसेवेची प्रेरणा त्यांना कुटुंबातून मिळाली असून आज स्वतःचे क्लिनिक बंद ठेवून स्वच्छता दूत महिलांची तपासणी करताना समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही आरोग्यविषयक मदतीसाठी सदैव उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. प्रदीप नन्नवरे यांनी महिलांनी वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम समाजसेवेचे असून “जनसेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून ते काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सैनिकांच्या कुटुंबांची गेली २० वर्षे तपासणी शुल्क न घेता करत असल्याचे सांगत, या प्रभागातील रस्ते स्वच्छता करणाऱ्या महिलांकडूनही पुढे तपासणी शुल्क घेणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.


यावेळी रस्ते स्वच्छता करणाऱ्या महिला तसेच घंटागाडीवर काम करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे यांना “नारीशक्ती कार्यगौरव” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पूजा जाधव यांनी स्वच्छतेची शपथ दिली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णा जोगदंड यांनी केले, तर आभार शहराध्यक्षा संजना करंजावणे यांनी मानले.


यावेळी पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पूजा हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप नन्नवरे, डॉ. शिवानी घुमरे–आरकर, आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, उपाध्यक्ष काळुराम लांडगे, सचिव गजानन धाराशिवकर, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, शहराध्यक्षा संजना करंजावणे, गणेश वाडकर, नगरसेविका रवीनाताई अंघोळकर, शिक्षण समिती सभापती, नगरसेविका दीप्तीताई कांबळे, पल्लवीताई जगताप, राम पाटील तसेच स्वच्छता विभागातील व संस्थेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने