पिंपरी चिंचवड (सलीम सय्यद) : आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळील बिजलीनगर येथून रेल्वे पुलाखालून ग.दि.मा. सभागृहाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. पुलाखालून बाहेर पडताना जवळपास संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच रस्ता अरुंद असल्यामुळे दुचाकी चालकांना खड्डे चुकवत वाहन चालवणे अत्यंत कठीण जाते.
यामुळे अनेक दुचाकीस्वार खड्ड्यांमध्ये अडकून पडतात व अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. खड्डे टाळण्यासाठी लोक ज्या भागात खड्डे नाहीत त्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याच वेळी समोरून येणाऱ्या वाहनांशी त्यांचा मार्ग आडवा होऊन अपघाताचा धोका वाढतो.
सदर रस्ता हा अतिशय वर्दळीचा असून नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. तसेच पुल ओलांडल्यानंतर बिजलीनगरच्या बाजूसही अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तेही त्वरित बुजवणे आवश्यक आहे. असे जेष्ठ नागरिक उल्हास दाते, जयंत कुलकर्णी, अनिल शिंदे यांनी सांगितले.
म्हणून संबंधित विभागाने सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून सर्व खड्डे बुजवावेत,अशी मागणी नागरिक करीत आहेत.
