!-- afp header code starts here --> घामाच्या थेंबांतून घडणारी परंपरा… लोखंडाला आकार देणाऱ्या हातांचा संघर्ष आणि स्वाभिमान

घामाच्या थेंबांतून घडणारी परंपरा… लोखंडाला आकार देणाऱ्या हातांचा संघर्ष आणि स्वाभिमान

 


वार्ताहर : शिवानंद चौगुले

आज माझ्या मूळ गावी धोत्री (जि. सोलापूर) येथे जाण्याचा योग आला आणि गावातील दैनंदिन जीवनातील एक असे दृश्य पाहायला मिळाले, ज्याने मन अक्षरशः भारावून गेले. आधुनिकतेच्या झगमगाटात हरवत चाललेल्या आपल्या ग्रामीण संस्कृतीची, श्रमसंस्कृतीची आणि बारा बलुतेदारी व्यवस्थेची जिवंत झलक आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.

गावात काही पारंपरिक पद्धतीने शेतीची अवजारे तयार करणारे कारागीर आले होते. रस्त्याच्या कडेला साधेसे भट्टीचे साहित्य, काही लोखंडी पट्ट्या, हातोडे, घण, चिमटे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य… एवढ्याच साधनांच्या सहाय्याने ते काही मिनिटांत सुंदर आणि मजबूत शेतीपूरक अवजारे तयार करत होते.

साध्या लोखंडी पट्टीवर गरम भट्टीत तापवून हातोड्याचे अचूक घाव पडत होते आणि त्या प्रत्येक घावामागे अनेक वर्षांची साधना, अनुभव आणि पोटाची खळगी भरण्याचा संघर्ष दिसत होता. मशीनमधून तयार होणाऱ्या गुळगुळीत आणि चमकदार वस्तूंमध्ये कदाचित बाजारातील आकर्षण असेल, परंतु या अवजारांमध्ये मात्र कष्टकऱ्यांच्या घामाचा सुगंध, श्रमाचे सौंदर्य आणि आत्मीयतेचा स्पर्श होता.

विशेष म्हणजे या कारागिरांसोबत असलेली मातृशक्ती पाहून मन भरून आले. हातात भला मोठा घण घेऊन ज्या ताकदीने त्या लोखंडावर घाव घालत होत्या, ते दृश्य खरोखर प्रेरणादायी होते. इतिहासात आपण जिजाऊ, ताराराणी, अहिल्यादेवी होळकर यांसारख्या पराक्रमी स्त्रियांच्या कथा ऐकतो; परंतु आज त्या सामर्थ्याची झलक प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याचा अनुभव आला.

एखाद्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे अचूक वेळ साधत त्या महिला हातोड्याचे घाव घालत होत्या आणि प्रत्येक घावातून लोखंडाला नवा आकार मिळत होता. त्या क्षणी जाणवले की, आपल्या पूर्वजांच्या काळातील स्त्रियांमध्ये किती अफाट शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य असावे!

या कुटुंबाशी संवाद साधला असता समजले की ते मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. वर्षातील जवळपास आठ महिने ते आपल्या घरापासून दूर राहतात. रोज एका गावातून दुसऱ्या गावात फिरत शेतकऱ्यांच्या गरजेनुसार कोयते, कुऱ्हाडी, खुरपे, विळे, फावडी, नांगराची अवजारे अशा विविध वस्तू तयार करून देतात आणि त्यावरच त्यांची उपजीविका चालते.

मात्र एवढ्या प्रचंड कष्टानंतरही या व्यवसायातून मिळणारा मोबदला समाधानकारक नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बदलत्या काळात मशीननिर्मित वस्तूंची वाढती स्पर्धा, महागाई आणि कमी होत चाललेली मागणी यामुळे हा पारंपरिक व्यवसाय टिकवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलेही होती. हातात काही अवजारे घेऊन ती गावातील शेतकऱ्यांच्या दारोदारी जाऊन विक्री करण्याचा प्रयत्न करत होती. मुलांच्या शिक्षणाविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, "सध्या शाळेला सुट्टी असल्याने मुले आमच्यासोबत आली आहेत. आमच्या गावात ती नियमित शिक्षण घेतात. आम्हाला त्यांना आमच्यासारखे भटकंतीचे जीवन नको आहे. त्यांनी शिकून मोठे व्हावे, हीच आमची इच्छा आहे."

हे शब्द ऐकून मन हेलावून गेले. स्वतः कठीण परिस्थितीत आयुष्य जगणारे हे आई-वडील आपल्या मुलांसाठी मात्र उज्ज्वल भविष्यासाठी स्वप्ने पाहत होते. हाच खरा पालकत्वाचा त्याग आणि संस्कारांचा वारसा आहे.

भारतीय समाजव्यवस्थेत एकेकाळी बारा बलुतेदार ही संकल्पना गावाच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. लोहार, सुतार, कुंभार, चांभार, न्हावी, परीट अशा विविध व्यवसायांमुळे गाव स्वयंपूर्ण होते. त्यामधील लोहार समाज हा शेतीच्या विकासाचा महत्त्वाचा घटक होता. शेतकऱ्यांच्या हंगामानुसार आवश्यक असलेली सर्व अवजारे तयार करून देण्याचे कार्य त्यांनी पिढ्यान्पिढ्या केले.

आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोठमोठ्या कारखान्यांतून हजारो अवजारे तयार होत असली, तरी या पारंपरिक कारागिरांच्या हातातील कौशल्य आणि टिकाऊपणा याची सर अनेकदा मशीनलाही येत नाही. कारण मशीन उत्पादन करते, पण कलाकार सर्जन करतो.

या पारंपरिक व्यवसायामागे विज्ञानही दडलेले आहे. लोखंड योग्य तापमानावर तापवणे, त्याची लवचिकता ओळखणे, योग्य वेळी योग्य दिशेने घाव घालणे, थंड पाण्यात बुडवून त्याला मजबुती देणे – या सर्व प्रक्रिया अनेक वर्षांच्या अनुभवातून आत्मसात झालेल्या आहेत. कोणत्याही अभियांत्रिकी महाविद्यालयात न शिकता हे लोक प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान जगत असतात.

आज गरज आहे ती अशा पारंपरिक व्यवसायांना नवसंजीवनी देण्याची. शासनाने या कारागिरांसाठी विशेष योजना, आर्थिक सहाय्य, आधुनिक साधने, विमा संरक्षण, मुलांच्या शिक्षणासाठी मदत आणि त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली, तर हा व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने उभारी घेऊ शकतो.

कारण ही केवळ काही अवजारे तयार करणारी माणसे नाहीत, तर आपल्या संस्कृतीचे, श्रमाचे आणि स्वाभिमानाचे जतन करणारे खरे कलाकार आहेत.

आज धोत्री गावात पाहिलेले हे दृश्य केवळ एका कुटुंबाचा संघर्ष नव्हता, तर बदलत्या काळात अस्तित्वासाठी झगडणाऱ्या संपूर्ण पारंपरिक समाजव्यवस्थेची कहाणी होती.

लोखंड तापवून अवजारे घडवणारे हे हात प्रत्यक्षात भारताची संस्कृती घडवत आहेत…

त्यांच्या हातातील घणाचा प्रत्येक घाव जणू एक संदेश देत होता –

"मशीन युग आले तरी श्रमाचा सन्मान कधीच संपणार नाही!"

– शिवानंद चौगुले

वार्ताहर, महाराष्ट्र जनभूमी न्यूज

थोडे नवीन जरा जुने