नवी दिल्ली (किशोर थोरात): मध्यपूर्वेतील तणावामुळे एलपीजी (LPG) आयातीवर परिणाम होत असून देशातील परिस्थिती अजूनही “चिंताजनक” असल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले.
पुरवठा सध्या सुरळीत असला तरी मागणीत वाढ झाल्याने नागरिकांनी शक्य असेल तिथे पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) कडे वळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पेट्रोलियम सचिव सुझाता शर्मा यांनी सांगितले की, एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी आतापर्यंत १३,७०० पेक्षा जास्त PNG कनेक्शन देण्यात आले आहेत. ऑनलाइन बुकिंगचे प्रमाण ९३% पर्यंत वाढले असून गुरुवारी सुमारे ५५ लाख रिफिल बुकिंग प्राप्त झाले.
त्यांनी पुढे सांगितले की, घाबरून केलेल्या (panic) बुकिंगमध्ये घट झाली आहे. मागील एका आठवड्यात सुमारे ११,३०० टन कमर्शियल एलपीजी ग्राहकांना पुरविण्यात आले आहे.
सरकारने स्पष्ट केले की:, एलपीजीचा पुरवठा सध्या नियमित आहे,मात्र मागणीत वाढ ही चिंतेची बाब आहे,शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना सुमारे ५०% कमर्शियल एलपीजी वाटप करण्यात येत आहे.
आतापर्यंत सुमारे ७,५०० ग्राहकांनी एलपीजीवरून PNG कडे वळण घेतले आहे. वितरण यंत्रणा सुरळीत असून सिलिंडर डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोडद्वारे केली जात आहे. केंद्र सरकारने राज्यांना सूचना दिल्या आहेत की: साठेबाजी (hoarding) रोखण्यासाठी कडक देखरेख ठेवावी, वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवावे. अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
पुरवठा व्यवस्थेबाबत माहिती देताना, राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत कोणतीही सागरी अडचण आली नाही. सर्व २२ भारतीय जहाजे आणि खलाशी सुरक्षित असून कोणत्याही बंदरावर गर्दी नाही.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैथम बिन तारिक अल सईद यांच्याशी चर्चा करून पश्चिम आशियातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशीही संवाद साधून सुरक्षा परिस्थितीवर चर्चा केली.
सरकारने नागरिकांना विनंती केली आहे की, अनावश्यक घाबरून बुकिंग करू नये आणि उपलब्ध पर्यायांचा वापर करून एलपीजीवरील ताण कमी करण्यात सहकार्य करावे.
