जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघातर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान


पुणे (किशोर थोरात) : जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, पुणे यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या आठ महिलांचा सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेच्या नवीन सदस्यांना ओळखपत्रांचेही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात सर्वप्रथम सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शलाका कोंडावार यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या सुमारे २० वर्षांपासून त्या समाजातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेत असून महापालिकेतील त्यांच्या कार्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

यानंतर महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या सुषमा इंगोले यांचा गौरव करण्यात आला. कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून गेली ३० वर्षे त्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी मोर्चे, आंदोलन आणि विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्या शाळांमध्ये लहान मुलांसाठी विविध उपक्रमही आयोजित करतात.

सुनंदा पेंधे या आदर्श गृहिणींचाही यावेळी सन्मान करण्यात आला. पतीच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहत दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. सध्या त्या “Bhaarvis फूड प्रॉडक्ट्स” या नावाने गृहउद्योग चालवत स्वावलंबनाचा आदर्श घालून देत आहेत.

वयाच्या साठाव्या वर्षातही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वेणूबाई सोनवणे या सफाई कामगार महिलांचाही विशेष गौरव करण्यात आला. सोसायटीमध्ये हाउसकीपिंगचे काम करताना त्या सर्वांना मातेसमान माया देतात आणि आपल्या प्रामाणिक कार्यामुळे सर्वांच्या मनात आदराचे स्थान मिळवले आहे.

दंतचिकित्सा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. सोनाली नलावडे काकडे यांचाही सत्कार करण्यात आला. त्या MDS Prosthodontist व Implantologist असून मागील १५ वर्षांपासून चिंचवड पूर्णानगर येथील Global Diagnostic Center मध्ये सेवा देत आहेत. विशेषतः वयोवृद्ध रुग्णांना आधुनिक Implantology तंत्राद्वारे कायमस्वरूपी दात बसवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या करत आहेत.

तसेच विद्या गरड या Amuket Product and Tech Solutions Pvt. Ltd. कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत असून उत्पादन व व्यवस्थापनातील त्यांच्या कुशलतेबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

वर्षा मलघे या चिखली पोलीस स्टेशनमध्ये गेल्या १६ वर्षांपासून कार्यरत असून गुन्हे नोंद, अकस्मात मृत्यू व मिसिंग प्रकरणांची अचूक माहिती ठेवण्यात त्या विशेष पारंगत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल २०१८ मध्ये एसपी व २०२५ मध्ये सीपी यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.

तसेच समाजातील प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकार सीता जगताप यांचाही सन्मान करण्यात आला. त्या श्रीशक्ती न्यूजच्या संपादक असून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडण्याचे कार्य करत आहेत.

या कार्यक्रमात संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किशोर थोरात यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देत स्त्री ही समाजाची शक्ती असून तिच्या विविध रूपांमुळे समाज घडतो, असे सांगितले. हा उपक्रम संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सामाजिक कार्यात पुणे जिल्हा टीम नेहमीच अग्रेसर असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष अमित कोकणे यांनी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत आजच्या बदलत्या जगात महिलांनी पुढाकार घेऊन समाज परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे सांगितले. त्यांनी माँ जिजाऊंचे उदाहरण देत महिलांचे महान योगदान अधोरेखित केले.

पुणे शहर जनरल सेक्रेटरी रविंद्र आळणे यांनी मनोगत व्यक्त करत स्त्री ही आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या विविध रूपांतून समाजाला संस्कार देणारी शक्ती असल्याचे सांगितले. “महिला दिन हा फक्त शुभेच्छा देण्याचा दिवस नसून स्त्रीचा आदर करण्याची आणि तिच्या हक्कांसाठी उभे राहण्याची शपथ घेण्याचा दिवस आहे,” असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे यांनी दूरध्वनीद्वारे सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत पुणे जिल्हा टीमचे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमास पुणे जिल्हा अध्यक्ष अमित कोकणे, पुणे जिल्हा सचिव विजय महाजन, सदस्य आबासाहेब आहेर, अभिजित दिवाणे, पिंपरी-चिंचवड शहर सचिव विनायक जगताप, सहसचिव मारुती तांबवड, सदस्य आशिष कदम, अमोल नेहेरे, विलास शेटकर, शारदा नरोन्हा, आफ्रिन सय्यद, सविता थोरात, स्मिता चोपडे, संपत्ती शिंदे, किरण कुशवाह, नीता देशमुख, मनीषा जाधव, सुश्मिता वरून, नूरजहाँ जमखाने, सारिका यादव, ऐश्वर्या पवार, राजश्री रावडे, अलका तांबवड तसेच ऐश्वर्यम हमारा सोसायटीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन Excellent International School आणि Junior College, मोशी चे प्राचार्य अमोल नेहेरे यांनी केले, तर कार्यक्रमाचे नियोजन मारुती तांबवड यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तसेच कार्यक्रमात महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

थोडे नवीन जरा जुने