शिवतेज नगर येथे ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा


ज्येष्ठ नागरिक संघाकडून महिलांचा सन्मान; प्रेरणादायी मनोगतांनी कार्यक्रम रंगला



पिंपरी-चिंचवड (शिवानंद चौगुले) : जागतिक महिला दिननिमित्त शिवतेज नगर येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिला दिनाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.


कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या उपाध्यक्षा अलका मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर संघातील सदस्यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत आपल्या मनोगतांमधून महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित केले.


या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. हरिनारायण शेळके यांच्यासह सुजाता दत्ता, अनिता दत्ता, मोहिनी जवळेकर, उज्वला मालनकर, सौ. जाधव, विनोद गुप्ता, सुरेश काटोले तसेच श्री. नेरकर यांनी महिलांच्या जीवनातील संघर्ष, त्याग, कर्तृत्व आणि समाजघडणीत असलेली महत्त्वाची भूमिका याविषयी आपले विचार मांडले. त्यांच्या प्रेरणादायी मनोगतांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली.


कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे उपस्थित सर्व महिलांचा करण्यात आलेला सन्मान होय. प्रमुख पाहुण्या अलका मोरे यांच्या हस्ते प्रत्येक महिलेला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान स्पष्टपणे झळकत होता.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता खरे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. स्नेहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


महिलांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेला हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला असून समाजात महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


थोडे नवीन जरा जुने