संगमनेर : तालुक्यातील वडगाव पान येथे १२ वर्षीय निष्पाप शाळकरी मुलीवर झालेल्या ऍसिड हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या संगमनेर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेने समाजमन हादरून गेले आहे.
या प्रकरणी _आमदार श्री. अमोल खताळ_ यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत घटनेचे गांभीर्य अधोरेखित केले. त्यावर _मंत्री आदिती ताई तटकरे_ यांनी पीडित कुटुंबाला “मनोधैर्य” योजनेतून मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच _पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील_ यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने जनरल सेक्रेटरी श्री. रविंद्र भाऊसाहेब आळणे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
श्री. रविंद्र आळणे म्हणाले: “एका निष्पाप १२ वर्षीय मुलीवर ऍसिड हल्ला करणे ही केवळ अमानुष आणि भ्याड कृती नसून, संपूर्ण समाजासाठी काळीमा फासणारी घटना आहे. अशा गुन्हेगारांना कोणतीही दया न दाखवता भारतीय दंड संहितेतील (IPC) कलम 326A आणि 326B अंतर्गत कठोर शिक्षा देणे अत्यावश्यक आहे. तसेच, या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात (Fast Track Court) खटला चालवून आरोपींना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “सरकारने केवळ मदत जाहीर करून थांबू नये, तर अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ऍसिड विक्रीवर कडक नियंत्रण, शाळा परिसरात सुरक्षा वाढविणे आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष मोहिमा राबवणे ही काळाची गरज आहे.”
संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. किशोर थोरात यांनीही अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, असे नमूद केले. तर *राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेश कुंभारे* यांनी या प्रकरणातील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत मोकळे सोडू नये, असे ठाम आवाहन केले आहे.
मागण्या:
●आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा
●फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविणे
●पीडित मुलीला संपूर्ण वैद्यकीय व आर्थिक मदत
●ऍसिड विक्रीवर कठोर नियंत्रण
●महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष धोरण
ही घटना केवळ एका कुटुंबावर नाही, तर संपूर्ण समाजावर झालेला आघात आहे. त्यामुळे शासन, प्रशासन आणि समाज यांनी एकत्र येऊन अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर भूमिका घेणे अत्यावश्यक आहे.
