लहानग्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी — निवेदन सादर

 


वार्ताहर : शिवानंद चौगुले

पिंपरी-चिंचवड : महात्मा फुले नगर येथील सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यानातील बारा वर्षाखालील मुलांच्या खेळण्याच्या परिसराची अत्यंत दयनीय व धोकादायक अवस्था समोर आली आहे. उद्यानात सर्वत्र अस्वच्छता, दुर्गंधी, कचऱ्याचे ढिगारे तसेच कालबाह्य, तुटलेली व धोकादायक खेळणी असल्याचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान निदर्शनास आले. या परिस्थितीमुळे लहान मुलांच्या आरोग्य व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. यशवंत कन्हेरे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाचे मुख्य उद्यान अधीक्षक तथा वृक्षाधिकारी श्री. महेश (कल्पना) बाळकृष्ण गारगोटे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्यांची सविस्तर माहिती देण्यात आली.

सादर करण्यात आलेल्या निवेदनात उद्यानाची तात्काळ स्वच्छता, तुटलेल्या व धोकादायक खेळण्यांची दुरुस्ती अथवा हटविणे, लहान मुलांसाठी सुरक्षित व आधुनिक खेळणी बसविणे तसेच खराब झालेल्या संरचनांची तातडीने दुरुस्ती करावी, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या.

संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लवकरच कार्यवाही करण्याची ग्वाही दिली असली, तरी प्रत्यक्षात ही कामे कितपत वेगाने पूर्ण होतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. लहान मुलांना सुरक्षित व स्वच्छ वातावरणात खेळण्याचा हक्क मिळावा, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

थोडे नवीन जरा जुने