उन्हाचा पारा वाढला असतानाही भाविकांची दर्शनास गर्दी
इंद्रायणी आरती आणि स्वच्छता अभियान उत्साहात
आळंदी (अर्जुन मेदनकर) : वरुथिनी एकादशी निमित्त परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी हरीनाम गजरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी झाली. उन्हाचा पारा वाढला असतानाही भाविकांची दर्शनास मोठी गर्दी झाली होती. माउली देवस्थानाने भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेण्याची मागणी भाविकांनी केली. भाविकांना थेट दर्शन बारी परिसरात पिण्याचे पाण्याची व्यवस्था केल्याने भाविकांची सोय झाली. सुमारे दिड ते दोन तास मंदिरात श्रींचे दर्शनास लागल्याचे भाविकांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र आळंदी नेहमी हजारो भाविकांचे गर्दीने फुललेली असते. यात लग्न समारंभ, एकादशी असल्याने अधिकची वाढ झाली. सुमारे लाखभर भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. उन्हाचा पारा चढलेला असतानाही भाविकांनी आळंदी मंदिरात श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी निमित्त श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. श्रींचे वैभवी दर्शन व्यवस्था आळंदी संस्थानने सोशल मीडियाचे माध्यमातून देखील सुरु ठेवली होती. कमी वेळेत जास्त भाविकांना दर्शन देण्यासाठी व्यवस्थापक माउली वीर, तुकाराम माने, देवस्थानचे सेवक कर्मचारी यांनी काम पाहिले. श्रींचे महाप्रसाद देण्यास सेवाभावी पणे सेवक बल्लाळेश्वर वाघमारे आणि सेवकांनी सेवा रुजू केली. भाविकांना थेट दर्शनबारीत पिण्याचे पाणी देण्यात तत्परता ठेवून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी लक्षपूर्वक नियोजन करण्यात आले होते.
आळंदी मंदिरात एकादशी निमित्त श्रींचे वैभवी गाभा-यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. या निमित्त मंदिरात हरिपाठ, देहुकरांचे कीर्तन सेवा तसेच ह.भ.प. संतोष मोझे यांचे वतीने हरीजागर सेवा होत असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य असे धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरा बाहेर मात्र काही वारकरी, भाविकांनी महाद्वारातून श्रींचे मुख दर्शन घेत नगरप्रदक्षिणा करीत स्थान माहात्म्य जोपासले.
इंद्रायणी नदी घाटावर देखील भाविकांनी स्नानास गर्दी करीत तीर्थक्षेत्री आचमन केले. आळंदीतील नगरप्रदक्षिणा करीत भाविकांनी एकादशी साजरी केली. तत्पूर्वी आळंदीत नगरपरिषदेचे वतीने सिध्दबेटात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्या नंतर आळंदी देवस्थान तसेच इंद्रायणी आरती सेवा समिती यांचे वतीने दोन स्वतंत्र आरतीचे उपक्रम राबविण्यात आले. आळंदी देवस्थान तर्फे आरतीचा इव्हेन्ट हरिनाम गजरात झाला. या वेळी अनेक मान्यवरांचे सत्कार झाले.
मंदिरात असे झाले धार्मिक कार्यक्रम यात एकादशी निमित्त पहाटे घंटानाद, काकडा आरती, पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांना सुलभ दर्शन, दुपारचा महानैवेद्य, दर्शन, श्रींना पोशाख, दर्शन, चार वाजता प्रवचन सेवा, सडे सहा वाजता कीर्तन सेवा, धुपारती, त्या नंतर पुन्हा दर्शन सुरु करण्यात आले. १२ ते पहाटे ४ हरी जागर सेवा संतोष महाराज मोझे यांचे वतीने सेवा रुजू झाली. दुपारी उटी पूजा झाली. फक्त महानैवेद्य आणि श्रींचे आरती प्रसंगी दर्शन थोडा वेळ बंद ठेवण्यात आले होते.
इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी सेवा समितीचे वतीने संयोजिका अनिताताई झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर, अनिता शिंदे, शोभा कुलकर्णी, कौसल्या देवरे, तारामती गोरे, सुवर्णाताई काळे, विमल लूकर, छबूताई जाधव, पंचफुला व्यवहारे, सुरेखा काळभोर, राधा पगारे, अलका पतंगे, रीनाताई पवार यांचेसह महिला भाविक, महिला बचत गटातील पदाधिकारी आदी उपस्थितीत होते.
आळंदी देवस्थान तर्फे आयोजित आरती प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय जगदाळे यांचे हस्ते आरती झाली. या वेळी प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक माउली वीर, श्रीधर सरनाईक, तुकाराम माने आदी मान्यवरांसह भाविक, नागरिक उपस्थित होते. हरिनाम गजर वेदमंत्र जयघोष करीत इंद्रायणी आरती उत्साहात झाली. एकादशी निमित्त सिध्दबेटात आळंदी नगरपरिषदेचे वतीने स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर आदी उपस्थित होते.
