पिंपरी चिंचवड : "स्वराज्याच्या इतिहासाची छोटी वारसदार! ज्योतिबा कॉलनीतील कु.शर्विका म्हात्रेने सर केले १७५ किल्ले; श्री शत्रुघ्न काटेंकडून सन्मान!" वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी १७५ गडकिल्ले सर;
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडकोटांच्या मोहिमेत रहाटणीतील एका चिमुकलीने सुवर्ण अक्षरांनी आपली नोंद केली आहे. रहाटणी, ज्योतिबा कॉलनी येथील रहिवासी असलेल्या कु. शर्विका म्हात्रे हिने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी तब्बल १७५ गडकिल्ले सर करण्याचा पराक्रम केला आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते विठ्ठलाची मूर्ती देऊन तिचा विशेष सन्मान करण्यात आला.
दुर्गभ्रमंतीचा नवा आदर्श...
स्वराज्याच्या गडकोटांचे जतन आणि संवर्धन व्हावे, तसेच नवीन पिढीला या इतिहासाची ओळख व्हावी यासाठी अनेक जण दुर्गभ्रमंती करतात. मात्र, ज्योतिबा कॉलनीतील कु. शर्विकाने इतक्या लहान वयात कठीण चढाई असलेले किल्ले पार करून सर्वांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. तिच्या या साहसी वृत्तीचे आणि जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शर्विकाच्या या यशाची माहिती मिळताच श्री. शत्रुघ्न काटे यांनी तिची भेट घेऊन तिचे अभिनंदन केले. "छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गड-किल्ले हे आपल्या स्वराज्याचे सामर्थ्य आणि इतिहासाची साक्ष आहेत. त्या गडकोटांची ओळख आणि जपणूक पुढील पिढीपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. इतक्या लहान वयात शिवरायांच्या इतिहासाशी नाळ जोडण्याचे काम आपल्या भागातील कन्या करत आहे, ही संपूर्ण रहाटणी आणि पिंपरी- चिंचवड शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या पिढीला मोबाईलच्या जगातून बाहेर काढून त्यांना अशा साहसी आणि ऐतिहासिक उपक्रमांकडे वळवणे ही काळाची गरज आहे.कु. शर्विकाने मिळवलेले हे यश इतर मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल." अशा शब्दांत त्यांनी तिचे कौतुक केले.
या गौरव सोहळ्यावेळी या गौरव सोहळ्यावेळी उद्योजक श्री भरतशेठ काटे, श्री कैलासशेठ कुंजीर,श्री निलेशशेठ कुंजीर, श्री शैलेशशेठ कुंजीर,कु.शर्विकाचे कुटुंबीय,ज्योतिबा कॉलनीतील नागरिक आणि परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
सर्वांनीच या 'बाल दुर्गप्रेमी'वर कौतुकाचा वर्षाव करत तिच्या पुढील मोहिमांसाठी शुभेच्छा दिल्या.
