उन्हाळ्याची चाहूल लागताच फळांचा राजा मानला जाणारा हापूस आंबा बाजारात दाखल झाला असला तरी यंदा त्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात कमी आवक झाल्याने दरात मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी पेटीचा भाव तब्बल ७ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि देवगड हे हापूसचे प्रमुख उत्पादन क्षेत्र मानले जातात. येथे सध्या दर तेजीत असून देवगड हापूस १५०० ते ३००० रुपये प्रति डझन, तर रत्नागिरी हापूस १००० ते २००० रुपये प्रति डझन दराने विकला जात आहे. ४ ते ६ डझनांच्या पेटीसाठी ग्राहकांना ५ ते ६ हजार रुपये मोजावे लागत आहेत.
राज्यातील मोठ्या बाजारपेठांमध्येही दर वाढलेले दिसतात. नवी मुंबई येथील APMC मार्केटमध्ये हापूस २५०० ते ७००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पुणे मध्ये १००० ते २००० रुपये प्रति डझन, तर पिंपरी परिसरात २३०० ते २६०० रुपये दर आहेत. बारामतीमध्ये १७०० ते २२o० रुपये दर नोंदवले गेले आहेत.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक येथे १५०० ते १८०० रुपये दर असून अहिल्यानगर येथे तुलनेने स्वस्त दर (९०० ते १५०० रुपये) आहेत. मराठवाड्यातील जालना येथे दरात मोठी तफावत असून १५०० ते ४००० रुपये दर पाहायला मिळतो.
काही ठिकाणी किलोवरही विक्री होत आहे. लातूर येथे २५० ते ३०० रुपये प्रति किलो, तर जळगाव येथे दर १००० ते ११०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.
दरम्यान, नांदेड येथे कर्नाटकातील आंबे हापूस म्हणून विकले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. चव आणि सुगंध साधर्म्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
राज्यातील काही बाजारपेठांमध्ये अजूनही हापूसची आवक झालेली नाही. वर्धा, पंढरपूर, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि बुलडाणा येथे अजून प्रतीक्षा कायम आहे. एप्रिलच्या उत्तरार्धात आवक वाढल्यानंतर दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
