४ व ५ एप्रिल रोजी पुण्यात राष्ट्र सेवा दलाचा निर्धार मेळावा

 


• राज्यभरातून ५०० हून अधिक सक्रिय कार्यकर्त्यांची उपस्थिती

• विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे मार्गदर्शन

पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या क्रियाशील कार्यकर्त्यांचा दोन दिवसीय निर्धार मेळावा दिनांक ४ व ५ एप्रिल २०२६ रोजी पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त तसेच महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे विशेष महत्त्व आहे.

या मेळाव्यात राज्य व देशभरातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून संविधान मूल्यांच्या संवर्धनासाठी कृती आराखडा निश्चित करण्याबाबत धोरणात्मक चर्चा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकशाही चळवळींमध्ये अग्रणी भूमिका बजावणाऱ्या राष्ट्र सेवा दलाने महाराष्ट्रात अनेक जनआंदोलने उभी केली असून विविध क्षेत्रांतील नेतृत्व घडवले आहे. बदलत्या राष्ट्रीय परिस्थितीत संघटनेला नव्या उर्जेसह पुढे नेण्याचा या मेळाव्याचा उद्देश आहे.

शनिवार, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ‘गांधी टॉक’ या चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण आयोजित करण्यात आले असून दिग्दर्शक किशोर बेळेकर यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रविवार, ५ एप्रिल रोजी सकाळी ध्वजारोहण व उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संपादक संजय आवटे व सचिन गोस्वामी उपस्थित राहणार आहेत. ‘आजचा आणि पुढचा भारत’ या विषयावर प्रा. डॉ. अजय गुडावर्थी मार्गदर्शन करणार असून ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ तसेच विवेक सावंत यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

मेळाव्यात विविध विषयांवर गटचर्चा होऊन त्यावर सादरीकरण करण्यात येणार असून पुढील कार्याची दिशा निश्चित केली जाईल. सायंकाळी समारोप समारंभाने मेळाव्याची सांगता होईल.

या मेळाव्यास राज्यभरातून किमान ५०० क्रियाशील कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित असल्याची माहिती मेळाव्याचे प्रमुख प्रकाश कांबळे यांनी दिली. आयोजनात राष्ट्र सेवा दल, पुणे जिल्ह्याचे संजय गायकवाड, विलास किरोते, अश्विनी सातव व मनीषा पाटील सहभागी आहेत.

संपर्क : ९८८११९१३६३

थोडे नवीन जरा जुने