पुण्यात वसुली एजंटांवर कडक कारवाईची सुरूवात — नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तांचे कठोर आदेश

 


पुणे : सोलापूर रोडवरील पंधरा नंबर चौक येथे क्रेडिट कार्ड थकबाकी वसुलीच्या वादातून एका नागरिकाला भर रस्त्यात मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आल्यानंतर पुणे शहर पोलीस प्रशासनाने तत्काळ कडक पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील वसुली एजंटांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर आदेश जारी केले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ही घटना उघडकीस आली. संबंधित प्रकरणात काही वसुली एजंटांनी नागरिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील बँका, वित्तीय संस्था आणि रिकव्हरी एजन्सींशी समन्वय साधून सर्व वसुली एजंटांची सविस्तर माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये एजंटांची ओळख, कामाचा तपशील, नियुक्ती प्रक्रिया तसेच त्यांची पार्श्वभूमी यांचा समावेश असेल.

तसेच, सर्व रिकव्हरी एजंटांची चरित्र पडताळणी (Background Verification) करणे बंधनकारक करण्यात येणार असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना वसुलीच्या कामात सहभागी करून घेण्यास सक्त मनाई करण्यात येणार आहे. बँका आणि संबंधित संस्थांनी कायद्याचे पालन करत वसुली प्रक्रिया पार पाडावी, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना देखील आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या बेकायदेशीर वसुली, धमकी किंवा मारहाणीच्या घटना घडल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

या कठोर निर्णयामुळे पुण्यातील वसुली एजंटांच्या मनमानीला आळा बसण्याची शक्यता असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने घेतलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

थोडे नवीन जरा जुने