नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी जाहीर केले की, यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस देशात सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) फक्त 90% इतके राहील, म्हणजेच साधारण 78 सेंटीमीटर पाऊस पडेल. सामान्यतः भारतात मोसमी पावसाचे प्रमाण 87 सेंटीमीटर असते.
IMD ने यापूर्वी मे महिन्यात 92% पावसाचा अंदाज व्यक्त केला होता; मात्र आता तो घटवून 90% करण्यात आला आहे. हवामान विभागाने यासोबतच जून महिना अधिक उष्ण राहील आणि देशातील अनेक भागांत उष्णतेच्या लाटा (Heatwaves) वाढतील, असा इशाराही दिला आहे.
केरळमध्ये लवकरच मान्सूनची एंट्री
IMD चे महासंचालक एम. मोहापात्रा यांनी सांगितले की, मान्सून सध्या बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राच्या काही भागांत सक्रिय झाला असून, पुढील आठवड्यात केरळसह दक्षिण भारत आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये दाखल होईल.
“मान्सून उशिरा आलेला नाही. आम्ही 26 मेची शक्यता वर्तवली होती, पण पुढील आठवड्यात तो दक्षिण केरळमध्ये पोहोचेल,” असे मोहापात्रा यांनी स्पष्ट केले.
अनेक भागांत पावसाची कमतरता
IMD नुसार, मध्य भारत, दक्षिण द्वीपकल्पीय भारत आणि उत्तर-पश्चिम भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः शेतीप्रधान ‘मान्सून कोर झोन’मध्येही पावसाची कमतरता जाणवू शकते.
जून महिन्यात देशातील बहुतेक भागांत पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र मे महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा 4% अधिक पाऊस झाला होता.
जूनमध्ये उष्णतेच्या लाटा वाढणार
IMD ने इशारा दिला आहे की जून महिन्यात दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांत उष्णतेच्या लाटांची तीव्रता अधिक राहू शकते.
तसेच महाराष्ट्र, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूतील काही भागांतही अतिरिक्त उष्णतेचा प्रभाव दिसून येईल.
“पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे दिवस आणि रात्रीचे तापमान दोन्ही वाढतील,” असे मोहापात्रा यांनी सांगितले.
एल निनोचा प्रभाव वाढणार
IMD ने सांगितले की, जून-जुलैपर्यंत ENSO-न्यूट्रल स्थिती राहील; मात्र त्यानंतर एल निनो सक्रिय होण्याची शक्यता आहे. ऑगस्टपर्यंत मध्यम ते तीव्र एल निनो विकसित होऊ शकतो.
एल निनोमुळे प्रशांत महासागरातील तापमान वाढते आणि त्याचा परिणाम भारतातील मान्सूनवर होतो. त्यामुळे पावसाचे प्रमाण घटते आणि हवामान अधिक उष्ण बनते.
हवामान तज्ज्ञ रघू मुर्तुगुडे यांनी म्हटले की, “यंदा पावसाचे वितरण असमान राहू शकते. काही काळ मान्सूनमध्ये खंड पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उत्तर-पश्चिम भारतात दमट उष्णतेच्या लाटा निर्माण होऊ शकतात.”
शेती आणि पाणीटंचाईवर परिणाम
अल्प पावसामुळे शेती आणि पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
FLAME विद्यापीठ, पुणे येथील प्राध्यापक अंजल प्रकाश यांनी सांगितले की, “भारताच्या 52% शेती क्षेत्राचा आधार पावसावर आहे. त्यामुळे पावसातील घट अन्नसुरक्षा, भूजल साठे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करू शकते.”
त्यांनी पावसाचे पाणी साठवणे, भूजल पुनर्भरण, समुदाय तलाव आणि शाश्वत जलव्यवस्थापनावर भर देण्याची गरज व्यक्त केली.
अन्न धोरण विश्लेषक देविंदर शर्मा यांनीही इशारा दिला की, खतटंचाई आणि वाढती महागाई यांच्या पार्श्वभूमीवर एल निनो आणि कमी पाऊस हे भारतीय शेतीसाठी धोकादायक ठरू शकतात.
