पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील तोरणा प्रभाग ‘फ’ अंतर्गत यमुनानगर परिसरात एक मोठे झाड अचानक उन्मळून पडल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे कोणतेही वादळ, मुसळधार पाऊस किंवा प्रचंड वारे नसताना हे झाड कोसळल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. प्राथमिक निरीक्षणात असे स्पष्टपणे दिसून येते की झाडाच्या चारही बाजूंनी सिमेंट, डांबर, पेव्हर ब्लॉक आणि काँक्रिटीकरण करण्यात आले होते. परिणामी झाडाच्या मुळांपर्यंत नैसर्गिक पावसाचे पाणी किंवा कृत्रिम पाणीपुरवठा पोहोचण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. दीर्घकाळ पाणी व नैसर्गिक पोषण न मिळाल्यामुळे झाड कमकुवत झाले आणि अखेर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीशिवाय जमिनीवर कोसळले.
आज शहर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली झाडांच्या बुंध्याभोवती मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण केले जात आहे. मात्र, हीच प्रक्रिया झाडांच्या जीवनासाठी घातक ठरत असल्याचे वास्तव अनेक ठिकाणी दिसून येत आहे. झाडांच्या मुळांना श्वास घेण्यासाठी मोकळी जमीन, पाणी झिरपण्याची व्यवस्था आणि नैसर्गिक पोषण आवश्यक असते. परंतु प्रशासनाच्या अतिरेकी सिमेंटकरणामुळे झाडांची वाढ खुंटत आहे. अनेक झाडे आतून पोखरली जात असून भविष्यात अशी झाडे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करू शकतात. यमुनानगर येथील घटना ही त्याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
महानगरपालिका दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करून वृक्षलागवडीचे मोठे दावे करते. वृक्षारोपणाचे फोटो, अभियान आणि जाहिराती मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात लागवड केलेल्या झाडांपैकी किती झाडे जगली, त्यांची योग्य देखभाल झाली का, त्यांना वेळेवर पाणी मिळाले का, याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाकडे नसते. अनेक ठिकाणी झाडे लावली जातात, पण त्यानंतर त्यांची पूर्णपणे उपेक्षा केली जाते. परिणामी पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली केवळ दिखाऊ कारभार सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. ज्या-ज्या ठिकाणी झाडांच्या बुंध्याभोवती सिमेंट, डांबर किंवा पेव्हर ब्लॉक लावून झाडे बंदिस्त करण्यात आली आहेत, ते त्वरित हटवून झाडांना मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी. पावसाचे पाणी मुळांपर्यंत पोहोचेल अशी वैज्ञानिक रचना करावी. तसेच शहरातील सर्व झाडांचे आरोग्य तपासणी अभियान राबवून धोकादायक व अशक्त झाडांची नोंद घ्यावी. प्रत्येक वर्षी वृक्षलागवड, झाडांचे संवर्धन, मृत झालेली झाडे आणि त्यांच्या देखभालीचा स्वतंत्र पर्यावरणीय ऑडिट अहवाल तयार करून तो सार्वजनिक करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
आज झाडे वाचवणे ही केवळ पर्यावरणाची नव्हे तर मानवी अस्तित्वाची गरज बनली आहे. कारण झाडे ही केवळ सौंदर्याची वस्तू नसून शुद्ध हवा, सावली, पावसाचे संतुलन आणि आरोग्यदायी जीवनाची आधारस्तंभ आहेत. प्रशासनाने केवळ घोषणांपुरते पर्यावरणप्रेम न दाखवता प्रत्यक्ष कृतीतून झाडांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे.
शिवानंद चौगुले, पिंपरी चिंचवड
