!-- afp header code starts here --> पाणी बचतीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पाणी बचतीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी



अल निनोच्या परिणामामुळे पावसाला विलंब;  पाण्याचा अपव्यय टाळून पावसाचे पाणी साठवण यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे आवाहन 

पिंपरी चिंचवड : शहरातील जलस्रोतांवरील वाढता ताण आणि यंदा अल निनोच्या परिणामामुळे मान्सूनला होत असलेला विलंब लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करून पाणी बचतीसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत नागरिकांना पाणी बचतीसंदर्भात विविध उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहन धुण्याचे टाळावे. व्यावसायिक वाहन धुलाई केंद्रांनी पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या यंत्रणांचा वापर करावा. तसेच खासगी व सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये नवीन पाणी भरणे शक्यतो टाळावे. 

घरगुती तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये फ्लश टँक, नळ, पाईपलाईन आणि इतर जलवाहिन्यांमधील गळती तात्काळ दुरुस्त करावी. पाण्याचा वापर कमी करण्यासाठी सर्व नळांना एरेटर्स बसविण्याचा आग्रह करण्यात आला आहे. पाणी वापरातील कार्यक्षमता वाढविणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे. 

शहरातील उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम वापर आणि पाण्याची दीर्घकालीन उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक स्तरावर पाणी बचतीची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरगुती पातळीवर गळती रोखणे, एरेटर्सचा वापर करणे, वाहन धुण्यासाठी नळाचे पाणी टाळणे तसेच पावसाचे पाणी साठवण यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, या उपाययोजनांचा अवलंब करावा. नागरिकांच्या सहकार्यामुळेच शहराची जलसुरक्षा अधिक मजबूत होईल, असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी व्यक्त केले  

तर पाणी बचत ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. सोसायट्या, व्यावसायिक आस्थापने, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांनी नियमितपणे पाणी वापराचा आढावा घेऊन बचतीच्या उपाययोजना राबवाव्यात. रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, पाण्याचा पुनर्वापर वाढविणे आणि अपव्यय टाळणे यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यास मोठी मदत होईल, असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता महेश बरिदे यावेळी म्हणाले. 


 

थोडे नवीन जरा जुने