!-- afp header code starts here --> पुणे जिल्ह्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण; २० जूनपासून घराघरात गणना अर्ज वितरणाची तयारी

पुणे जिल्ह्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण; २० जूनपासून घराघरात गणना अर्ज वितरणाची तयारी

 


पुणे (वर्षा चव्हाण) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम शनिवार (दि. २० जून) पासून सुरू होणार असून ही प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्र प्रतिनिधींची तातडीने नियुक्ती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्षांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

# पुणे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक मतदार

जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, राज्यातील सर्वाधिक मतदार संख्या पुणे जिल्ह्यात असून सध्या जिल्ह्यात ८ हजार ४१७ मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या ९० लाख ८४ हजार ८८ इतकी आहे. पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नयेत आणि अपात्र व्यक्तींचा मतदार यादीत समावेश होऊ नये, या उद्देशाने विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

# असा असेल कार्यक्रमाचा टप्प्याटप्प्याने आराखडा

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार :

- २० ते २९ जून : मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण व गणना अर्ज छपाई

- ३० जून ते २९ जुलै : घराघरात जाऊन गणना अर्जांचे वितरण

- ५ ऑगस्ट : तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध

- ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर : दावे व हरकती स्वीकारणे

- ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर : हरकतींवर सुनावणी

- ७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध


# प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्यात आल्याचे सांगताना जिल्हाधिकारी डुडी यांनी ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जाईल, असे स्पष्ट केले. दावे व हरकतींवरील सुनावण्या मंडलनिहाय घेण्यात येणार असून सुनावणीच्या तारखा किमान दहा दिवस आधी जाहीर करण्यात येतील.

राजकीय पक्षांनी क्षेत्रीय स्तरावर सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी समन्वय राखण्याचे आवाहन केले. मतदान केंद्र प्रतिनिधींना मतदारांकडून गणना अर्ज गोळा करून दररोज ५० अर्ज जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे.

# दर बुधवारी राजकीय पक्षांची आढावा बैठक

मतदार याद्यांमधील त्रुटी, चुका व तांत्रिक अडचणी त्वरित दूर करण्यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुरू असेपर्यंत प्रत्येक बुधवारी दुपारी १.३० वाजता राजकीय पक्षांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत क्षेत्रीय स्तरावरील समस्या मांडून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

# तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांवर विशेष लक्ष

उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी सादरीकरणाद्वारे संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. समाजातील कोणताही घटक मतदार यादी प्रक्रियेपासून वंचित राहू नये यासाठी समाजकल्याण विभागाच्या सहकार्याने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

मतदार यादीत नाव असलेल्या तृतीयपंथी मतदारांचा सध्याचा पत्ता शोधून त्यांच्यापर्यंत गणना अर्ज पोहोचविण्यात येणार आहे. तसेच ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि भोर, जुन्नर, मुळशीसारख्या आदिवासी भागांतील कामानिमित्त बाहेरगावी गेलेले मतदार यांच्यापर्यंतही गणना अर्ज पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

बैठकीदरम्यान विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंका व सूचनांचे निरसन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने