वार्ताहर : शिवानंद चौगुले
PCMC
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना आणि आंद्रा धरणांतील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने शहरावर पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. यंदा मान्सूनने अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्याने उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, भविष्यातील संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पाणी बचतीसाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत.
सध्या पवना धरणातील पाणीसाठा केवळ सुमारे २० ते २१ टक्क्यांवर तर आंद्रा धरणातील साठा २९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने महापालिकेला १५ टक्के पाणी कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत पुढील पंधरवड्यात पाणी कपातीबाबत अंतिम निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर रवी लांडगे यांनी शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण घोषणा करत सर्व महापालिका जलतरण तलाव तातडीने बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्या खासगी स्विमिंग पूल, वाहन धुलाई केंद्रे (वॉशिंग सेंटर्स), बांधकाम प्रकल्प आणि इतर व्यावसायिक आस्थापनांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
महापौर रवी लांडगे यांनी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना पत्राद्वारे तातडीच्या पाणी बचत उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. २५ जूनपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास शहरात पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागू शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजनबद्ध पाणी व्यवस्थापन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी याच कालावधीत पवना धरणात सुमारे २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा तो आणखी घसरल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातच एल निनोच्या संभाव्य परिणामामुळे मान्सूनचे आगमन उशिरा होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महापौरांनी नागरिकांनाही पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असून, "पाणी ही अमूल्य संपत्ती आहे. प्रत्येक थेंब वाचविणे ही काळाची गरज असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाणी बचतीचे नियम पाळल्यास संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळता येऊ शकते," असे त्यांनी म्हटले आहे.
महापालिकेकडून लवकरच विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरात जलसंधारण, पाणी बचत आणि नियोजनबद्ध वापराला अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
