!-- afp header code starts here --> शेतीपंपाच्या केबल चोरी करणारी टोळी जेरबंद; साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शेतीपंपाच्या केबल चोरी करणारी टोळी जेरबंद; साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत


जुन्नर (रफिक शेख) : जुन्नर तालुक्यातील कुसूर गाव व वडज धरण परिसरात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या केबल चोरी करणाऱ्या टोळीला जुन्नर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ४ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कुसूर गाव व वडज धरण परिसरात शेतीपंपाच्या केबल चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जुन्नर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. यानंतर चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात आला.

या कारवाईत सुनील बाळू हिलम, सुनील सुरेश पवार आणि अंकुश रघुनाथ मुकणे (सर्व रा. किशोर बडला, ता. मुरबाड, जि. ठाणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान आरोपींकडून शेतीपंपाच्या चोरीस गेलेल्या केबलसह एकूण सुमारे ४.६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपींकडून एक कोयता, कटर, दोन चाकू, तीन मोबाईल फोन आणि गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली हिरो होंडा शाईन दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे.

जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीपंपांच्या केबल चोरीच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जुन्नर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

तसेच, ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या केबल चोरीस गेल्या असतील त्यांनीही पुढील तपासासाठी जुन्नर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या कारवाईमुळे परिसरातील केबल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून, जुन्नर पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.


थोडे नवीन जरा जुने