!-- afp header code starts here --> स्वछ भारत मिशन अंतर्गत 'आरआरआर' संकलन मोहिमेला आळंदीकरांचा उदंड प्रतिसाद

स्वछ भारत मिशन अंतर्गत 'आरआरआर' संकलन मोहिमेला आळंदीकरांचा उदंड प्रतिसाद

 


​आळंदी (अर्जुन मेदनकर) : शहराला स्वच्छ, सुंदर आणि  प्रदूषण मुक्त बनवण्याच्या उद्देशाने आळंदी नगरपरिषद आणि कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'आरआरआर' ( Reduce, Reuse, Recycle ) संकलन मोहिमेला आळंदीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

  आळंदी शहरातील दिशा होरीझोन्स सोसायटी, कन्सेप्ट हेरिटेज सोसायटी आणि साई समृद्धी सोसायटी या तीन मोठ्या सोसायट्यांमध्ये हा आगळावेगळा आणि पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. ​सध्या शहरी भागात वाढता कचरा ही एक मोठी समस्या बनली आहे. अनेकदा नागरिकांच्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्यांचा वापर होत नाही, परंतु त्या बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत असतात. या वस्तू रस्त्याच्या कडेला किंवा घंटागाडीत कचऱ्यात फेकल्या जातात. यावर उपाय म्हणून आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने या संकलन मोहिमेचे ( कलेक्शन ड्राईव्ह ) आयोजन करण्यात आले होते. ​या मोहिमे अंतर्गत नागरिकांनी न वापरण्यात येणारे जुने कपडे, चप्पल-बूट, घरातील जुनी भांडी, लहान मुलांची खेळणी, वाचून झालेली पुस्तके, शालेय बॅग आणि जुने फर्निचर मोठ्या प्रमाणात संकलन करण्यात आले. ​या संकलन ड्राईव्हच्या माध्यमातून केवळ वस्तूच गोळा केल्या गेल्या नाहीत, तर नागरिकांमध्ये 'आरआरआर' ( कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण ) या संकल्पनेबाबत मोठी जनजागृती करण्यात आली. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास सार्वजनिक आरोग्य कसे सुधारते, स्वच्छतेचे फायदे काय आहेत, टाकाऊतून टिकाऊ वस्तूंची पुनर्निर्मिती कशी होते आणि या संपूर्ण प्रक्रियेतून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला कशी चालना मिळू शकते, याचे महत्त्व कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना सविस्तर पणे समजावून सांगितले.

​   या स्तुत्य उपक्रमाला आळंदी नगरपरिषदे कडून मोठे पाठबळ मिळाले. मोहिमे दरम्यान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर,   सर्व नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी अभियान दरम्यान नागरिकांचा उत्साह वाढवला.

​दिशा होरीझोन्स आणि साई समृद्धी सोसायटी मधील नागरिकांनीही या आवाहनाला साद देत घराबाहेर पडून या मोहिमेत हिरीरिने सहभाग नोंदवला. या यशस्वी उपक्रमामुळे आळंदी शहराच्या स्वच्छतेच्या दिशेने एक अत्यंत सकारात्मक पाऊल पडले असून, अशा पर्यावरणपूरक मोहिमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

थोडे नवीन जरा जुने