पिंपरी चिंचवड : जागतिक पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, पुणे, सहजयोग परिवार, अथर्व अक्वाटेक, अमुकेत प्रॉडक्ट्स आणि श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज इंद्रायणी नगर, भोसरी येथील जंगल गार्डन परिसरात २५० वृक्षांचे भव्य वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात सुमारे १५० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले.
या कार्यक्रमास सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. किशोर आण्णासाहेब थोरात, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री. रवींद्र आळणे, पुणे जिल्हाध्यक्ष श्री. अमित कोकणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवान वायकर ,आबासाहेब आहेर, लोखंडे साहेब,पर्यावरण प्रेमी श्री विश्वनाथ टेमगिरे ,तसेच संघटनेचे अनेक पदाधिकारी, सदस्य आणि पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. किशोर थोरात म्हणाले की, “वृक्षारोपण ही कोणत्या एका व्यक्तीची किंवा एका संस्थेची गरज नसून संपूर्ण जगासमोरील पर्यावरणीय संकटावर मात करण्यासाठीची सामूहिक जबाबदारी आहे. वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि बदलते हवामान यामुळे वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधिक वाढले आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे.”
तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर श्री. रविभाऊ लांडगे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “हरित पिंपरी-चिंचवड शहर” या उपक्रमाला प्रतिसाद देत सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने “एक झाड दत्तक योजना” सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेअंतर्गत नागरिकांनी लावलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री. रवींद्र आळणे यांनी आपल्या मनोगतात अशा प्रकारचे पर्यावरणपूरक उपक्रम राज्यभर मोठ्या प्रमाणावर राबविण्याची गरज व्यक्त केली. तसेच या कार्यासाठी प्रसिद्ध “वॉटर मॅन” म्हणून ओळखले जाणारे जुन्नरचे शिवनेरी भूषण श्री. रमेश खरमाळे यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण उपक्रमासाठी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेश कुंभारे यांची प्रेरणा लाभल्याचे आयोजकांनी नमूद केले. लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचे असे उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबविणे ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचेही यावेळी उपस्थितांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेण्यात आली आणि लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


