विधानभवनातील झुंबर सभागृहात आयोजित मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशिला देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, शेतरस्ते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा समावेश करण्यात यावा. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या दैनंदिन अडचणी दूर होतील आणि शेतीमाल वाहतुकीला गती मिळेल,योजनेच्या कामांचा नियमित आढावा घेण्यासाठी दरमहा बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या बैठकीस जिल्ह्यातील सर्व आमदारांना निमंत्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा समावेश करण्याची सूचना केली. रस्ते निर्मितीच्या कामात सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये कंत्राटदारांच्या पॅनलची माहिती, एल-१ निविदा दर तसेच मोजणी पूर्ण झालेल्या ५०५ रस्त्यांची माहिती देण्यात आली. मोजणी पूर्ण झालेल्या रस्त्यांची कामे येत्या आठवडाभरात सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणारी ठरणार असून जिल्ह्यात दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

