!-- afp header code starts here --> चौथीच्या गणिताच्या पुस्तकातील चुका मान्य; पुढील आवृत्तीत दुरुस्ती, QR कोडवर सुधारित माहिती

चौथीच्या गणिताच्या पुस्तकातील चुका मान्य; पुढील आवृत्तीत दुरुस्ती, QR कोडवर सुधारित माहिती

 


रामानुजन यांच्या निधनाच्या तारखेसह मराठी व इंग्रजी माध्यमातील काही मुद्रणदोष; विद्यार्थी-शिक्षकांसाठी व्हिडीओद्वारे तातडीने मार्गदर्शन

पुणे - (वर्षा चव्हाण) इयत्ता चौथीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील काही मुद्रणदोषांची दखल राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) घेतली असून, संबंधित त्रुटी पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्यात येणार आहेत. तोपर्यंत विद्यार्थी व शिक्षकांना योग्य माहिती मिळावी यासाठी सुधारित माहितीचा व्हिडीओ पाठ्यपुस्तकातील QR कोडद्वारे उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

चौथीचे गणिताचे पाठ्यपुस्तक १० माध्यमांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्यापैकी मराठी आणि इंग्रजी माध्यमातील काही मुद्रणदोष निदर्शनास आले आहेत. पृष्ठ क्रमांक १०९ वर भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकीने २७ एप्रिल १९२० अशी छापली गेली असून, ती २६ एप्रिल १९२० अशी दुरुस्त करण्यात येणार आहे.

मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक ५५ वरील स्वाध्यायातील ‘जोड्या लावा’ या प्रश्नात ‘१००० ग्रॅमपेक्षा जास्त’ असा मजकूर छापण्यात आला आहे. त्याऐवजी ‘१००० किलोग्रॅमपेक्षा जास्त’ असे असणे अपेक्षित असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक ७७ वरही दोन मुद्रणदोष आढळले आहेत. त्यामध्ये ‘of’ ऐवजी ‘of ₹1.’ तसेच ‘₹1.49 rupees’ ऐवजी ‘49 rupees’ असा मजकूर असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शिक्षकांना योग्य माहिती त्वरित उपलब्ध व्हावी यासाठी सर्व सुधारित बदलांचा व्हिडीओ संबंधित पाठ्यपुस्तकातील QR कोडवर अपलोड करण्यात येणार आहे. तसेच सर्व मुद्रणदोष पुढील आवृत्तीत कायमस्वरूपी दुरुस्त करण्यात येणार असल्याचे बालभारतीने स्पष्ट केले आहे.

थोडे नवीन जरा जुने