– डॉ. किशोर अण्णासाहेब थोरात
युरोपातील अनेक देशांमध्ये सध्या विक्रमी उष्णतेची लाट उसळली असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवरील डांबर वितळणे, रेल्वेचे रुळ वाकणे आणि जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना घडत आहेत. ही परिस्थिती केवळ युरोपपुरती मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी गंभीर इशारा आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. किशोर अण्णासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. थोरात म्हणाले की, हवामान बदल, वाढते प्रदूषण, जंगलतोड, औद्योगिकीकरणामुळे होणारे कार्बन उत्सर्जन आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर यामुळे पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. आज त्याचे परिणाम युरोपमध्ये दिसत असले तरी उद्या त्याची तीव्रता भारतासह इतर देशांनाही मोठ्या प्रमाणात भोगावी लागू शकते.
भारतातही गेल्या काही वर्षांत उष्णतेच्या लाटा, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ आणि बदलते ऋतुचक्र यामुळे शेती, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारी जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.
डॉ. थोरात यांनी नागरिकांना अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचे, जलसंधारणाला प्राधान्य देण्याचे, प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे, ऊर्जा बचत करण्याचे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. तसेच शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांनी पर्यावरण जनजागृतीचे व्यापक अभियान राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
"निसर्गाशी संघर्ष करून मानवाचे अस्तित्व टिकणार नाही. निसर्गाशी सुसंवाद साधूनच भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित पृथ्वी देणे शक्य आहे. आज आपण जागे झालो नाही, तर उद्या निसर्ग आपल्याला जागे करेल," असा इशाराही डॉ. थोरात यांनी दिला.
'पृथ्वी वाचवा, पर्यावरण जपा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवीगार धरती निर्माण करा', असा संदेश त्यांनी यानिमित्त दिला.
