धार्मिक ज्ञानयज्ञ पर्वणीस उत्साहात प्रारंभ
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आषाढी वारी पालखी सोहळा सन २०२६ अंतर्गत सप्ताह हरिनाम गजरात प्रारंभ झाल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.
श्रींचे संजीवन समाधी मंदिरात १ ते ८ जुलै या दरम्यान सप्ताह मंदिरात साजरा होत आहे. या निमित्त मंदिरात सायंकाळी चार ते पाच या वेळात प्रवचन आणि सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळात कीर्तन सेवा होणार आहे. यामध्ये राज्यातील नामवंत प्रवचनकार अशोक महाराज इदगे, दत्तात्रेय माशेरे महाराज, कृष्णा पडवळ महाराज, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजननाथ, भागवत महाराज साळुंखे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांची प्रवचन सेवा माऊली मंदिरात होणार आहे. तसेच सायंकाळी साडेसहा वाजता राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. यात देहूकर महाराज फड, हराळे वैष्णव संस्था, साधकाश्रम संस्था, सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था, भाईजी महाराज मोगलगावकर, श्री वालुरकर यांच्या वतीने कीर्तन सेवा रुजू होणार असल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.
या सप्ताहाचा प्रारंभ पालखी सोहळा प्रमुख ऍड राजेंद्र उमाप यांच्या हस्ते पूजा करून झाली. या वेळी विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक माऊली वीर, पुजारी अमोल गांधी, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, मंगेश आरु, राजाभाऊ चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. वेद मंत्र जयघोषासह हरिनाम गजरात आषाढी वारी २०२६ अंतर्गत सप्ताह आळंदी मंदिरात सुरू झाला.
आमदार रोहित पवार यांची बैलजोड मानकरी यांचे समवेत चर्चा
ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ ओढण्याचा मान रानवडे कुटुंबाच्या तीन ग्रामस्थांच्या बैलजोडींना देण्यात आला आहे. मानाच्या बैलजोडींची पूजा आणि पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) आमदार रोहित पवार यांनी केली. या वेळी त्यांचे बाबा राजेंद्र पवार हि त्यांचे सोबत होते. ते म्हणाले, आळंदीत श्रींचे रथाचे बैलजोडीची पूजा करण्याचे भाग्य बाबां समवेत लाभले. आनंदाची, अध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. या सदिच्छा भेटीत त्यांनी तिन्ही बैलजोडी सेवा देणाऱ्या मानकरी यांचे बैलजोडीची माहिती जाणून घेत पाहणी करीत पूजा केली. या मध्ये उमेश रानवडे यांच्या हिरा - लाडक्या, तुळशीराम रानवडे यांच्या सुर्या - रामा आणि हर्षवर्धन रानवडे यांच्या भिम - अर्जुन या बैलजोडींची पाहणी हि केली. या वेळी माजी नगराध्यक्ष देवकाते, आळंदीचे माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक राहुल चिताळकर पाटील, नितीन साळुंखे, अनिकेत कुऱ्हाडे, शितल रानवडे, पै. शिवाजीराव रानवडे, साहेबराव कुऱ्हाडे, सौरभ रानवडे, सचिन रानवडे, सौरभ गव्हाणे, प्रियेश रानवडे आदी उपस्थित होते.
आळंदी येथील पीएमपीएमएल बस स्थानकात पावसाने प्रचंड चिखल झाला असून राज्यातून आलेल्या भाविकांची रहदारीत गैरसोय झाली. येथील बस स्थानक भाविक, नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी भाविकांचे वतीने पीएमपीएमएल आणि आळंदी नगरपरिषद प्रहसासनास केली आहे. यात पिण्याचे पाणी, स्वच्छता, निवारा शेड व्यवस्था, बस स्थानक परिसरात पथ दिवे आदींचा समावेश आहे.
या वर्षी पालखी सोहळ्यात नवा ओढण्यास हलका रथ
या वर्षी श्रींचे पालखी सोहळ्यात सुमारे ३० लाख रुपये खर्च करून आळंदी देवस्थान नवीन लक्षवेधी पालखी रथ आणत आहे. रथ बांधणीचे सुशोभीकरणाच्या काम अंतिम टप्प्यात आले असून सहज भाविकांना दर्शन घेण्यास सुखकर राहणार आहे. या रथाचे वजन पूर्वीचे रथाचे वजनापेक्षा सुमारे १ टणने कमी रहाणार असल्याने बैलजोडीस रथ ओढणे सुखकर आणि सहज होणार आहे. रथ नक्षीकामासह लक्षवेधी होत आहे. यावर पारंपरिक देवदेवतांचे काम लक्षवेधी झाले आहे. यात मारुती, जय विजय आदींचा समावेश आहे. आळंदी देवस्थानसह आळंदी नगरपरिषद, आळंदी पोलीस स्टेशन, आळंदी वीज वितरण कंपनी आणि आळंदी ग्रामीण रुग्णालय पालखी सोहळ्याचे तयारीत व्यस्त आहे. सर्वत्र तयारीची लगबग सुरु झाली असून ठिकठिकाणी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अंकापुरी भाविकांचे स्वागतास सज्ज होताना दिसत आहे.
