- आमदार महेश लांडगे यांच्या ‘व्हीजन’मधील आणखी एक प्रकल्प दृष्टीक्षेपात
- अमृत 2.0 अंतर्गत 430.75 कोटी रुपयांच्या विकासकामांना हिरवा कंदील
पिंपरी चिंचवड -पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरणीय विकासाला आणि इंद्रायणी नदीच्या पुनरुज्जीवनाला मोठी चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी इंद्रायणी वॉटर बॉडी सर्वांगीण पुनरुज्जीवन प्रकल्पाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत सुमारे 430.75 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी करणे, जलगुणवत्ता सुधारणे, नदीकाठाचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि नागरिकांसाठी पर्यावरणपूरक नदीकिनारा विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी एकूण आठ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी तीन निविदा तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्यानंतर आर्थिक छाननी करण्यात आली. या प्रक्रियेत मे. एल.सी. इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीची सुधारित निविदा सर्वात लाभदायक ठरली असून, अंदाजित खर्चापेक्षा सुमारे तीन टक्के कमी दराने काम करण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निधीची बचत होण्यासह गुणवत्तापूर्ण कामाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पाला केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका हिस्सा सुमारे 526 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर निविदा प्रक्रियेत अंतिम झालेली 430 कोटी 75 लाख 61 हजार 777 रुपयांची निविदा स्थायी समितीने मंजूर केली आहे. या रकमेमध्ये रॉयल्टी तसेच मटेरियल टेस्टिंग शुल्काचाही समावेश असून, प्रकल्पाची कामकाजाची मुदत 36 महिने निश्चित करण्यात आली आहे. तसेच, इंद्रायणी नदी पात्रालगत 60 MLD क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदीप वाघेरे आणि शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी विरोध केला. त्याचा विरोध नोंदवून हा विषय मंजूर करण्यात आला.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर इंद्रायणी नदीचे नैसर्गिक स्वरूप जपणे, नदीपात्रातील गाळ आणि प्रदूषण कमी करणे, नदीकाठाचे सुशोभीकरण, हरित क्षेत्र विकसित करणे, पादचारी सुविधा निर्माण करणे तसेच पर्यावरणपूरक नागरी विकासाला चालना देणे शक्य होणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक नदीकिनाऱ्याचा लाभ मिळण्याबरोबरच भविष्यातील शाश्वत विकासालाही बळ मिळणार आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर आता प्रशासकीय औपचारिकता पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता असून, पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणीय इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
प्रतिक्रिया :
"इंद्रायणी नदी ही पिंपरी-चिंचवड शहराची पर्यावरणीय जीवनरेखा आहे. तिचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन ही केवळ विकासाची बाब नसून, भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी आहे. अमृत 2.0 अंतर्गत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यामुळे नदीचे प्रदूषण कमी होईल, पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल आणि नागरिकांना स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक नदीकिनारा उपलब्ध होईल. हा प्रकल्प शहराच्या शाश्वत विकासासाठी मैलाचा दगड ठरेल. दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्यासाठी स्थायी समिती कटिबद्ध आहे."
- अभिषेक बारणे, अध्यक्ष, स्थायी समिती.
*******
प्रतिक्रिया :
"इंद्रायणी नदी ही आपल्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यावरणीय वारशाचा अविभाज्य भाग आहे. या नदीचे पुनरुज्जीवन हे केवळ विकासाचे काम नसून, भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. अमृत 2.0 अंतर्गत इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्याने या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या प्रकल्पामुळे नदीचे प्रदूषण कमी होईल, जलगुणवत्तेत सुधारणा होईल, जैवविविधतेचे संवर्धन होईल आणि नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व आकर्षक नदीकिनारा उपलब्ध होईल. राज्य शासन, महापालिका आणि सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून हा प्रकल्प गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निर्धारित मुदतीत पूर्ण व्हावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
