पुणे (वर्षा चव्हाण) : घरगुती स्वयंपाक कौशल्याला व्यावसायिक रूप देत महिलांसह युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अमृत (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) संस्थेतर्फे २१ व २२ जुलै २०२६ रोजी पुण्यात 'अमृत अन्नपूर्णा क्लाउड किचन ट्रेनिंग प्रोग्राम' आयोजित करण्यात आला आहे.
ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचा वाढता वापर आणि घरगुती खाद्यपदार्थांना मिळणारी वाढती मागणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अल्प गुंतवणुकीत स्वतःचा खाद्य व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या गृहिणी, युवक-युवती आणि नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण विशेष लाभदायी ठरणार आहे.
या दोन दिवसीय प्रशिक्षणात क्लाउड किचन व्यवसायाची संपूर्ण माहिती तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शनासह दिली जाणार आहे. यामध्ये एफएसएसएआय (FSSAI) नोंदणी व परवाना प्रक्रिया, Swiggy आणि Zomato सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्यवसाय नोंदणी, मेनू नियोजन, पॅकेजिंग, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन आणि व्यवसाय वाढीच्या रणनीती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागीांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिलांच्या उद्योजकतेला चालना देणे, युवकांना रोजगारनिर्मितीसाठी सक्षम करणे आणि घरगुती उद्योगांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे अमृत संस्थेने स्पष्ट केले आहे.
प्रशिक्षणासाठी प्रवेश मर्यादित असून 'प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर सहभागींची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश केसकर (मो. ९३५९४०३८९१) किंवा अमृत पुणे जिल्हा कार्यालय (मो. ९११२२२८७६७) येथे संपर्क साधता येईल. तसेच अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.
