इराण ने इशारा दिला की होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) ही त्यांच्यासाठी "लाल रेषा" (Red Line) आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या वीज प्रकल्पांवर, पूलांवर किंवा इतर पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची धमकी प्रत्यक्षात आणली, तर इराण संपूर्ण आखाती (गल्फ) प्रदेशातील पायाभूत सुविधांवर हल्ले करेल, असा इशारा त्यांनी दिला.
अमेरिकेने बुधवारी सलग पाचव्या रात्री इराणवर हल्ले केले आणि इराणच्या बंदरांवर पुन्हा नौदल नाकेबंदी लागू केली. वॉशिंग्टनचे म्हणणे आहे की याचा उद्देश इराणने मागील शनिवारी बंद केलेली होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा जहाजांसाठी खुली करणे हा आहे. ही सामुद्रधुनी युद्धापूर्वी जगातील सुमारे २० टक्के तेल आणि वायू वाहतुकीचा मार्ग होती.
पहिल्या हल्ल्यानंतर तेहरानचे वरिष्ठ वाटाघाटी प्रतिनिधी मोहम्मद बाकर कालीबाफ यांनी म्हटले,
"आम्ही अमेरिकेविरुद्ध अस्तित्वाच्या युद्धात आहोत."
इराणी लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल मोहम्मद अक्रमिनिया यांनी सांगितले की होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचे पूर्ण नियंत्रण आहे.
त्यांनी म्हटले, "अमेरिकेला वाटले की दक्षिण किनाऱ्यावरील आमच्या काही तळांवर हल्ला करून ते या सामरिक सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवतील. पण इराणला आपल्या संपूर्ण भूभागातून होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे. हे नियंत्रण केवळ किनारे किंवा बेटांवर अवलंबून नाही."
रॉयटर्सशी बोललेल्या तीन अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की अमेरिकेचे हल्ले केवळ सामुद्रधुनी उघडण्यासाठी नसून, भविष्यातील मोठ्या लष्करी कारवायांसाठी आवश्यक असलेली इराणची लष्करी क्षमता नष्ट करण्यावरही लक्ष केंद्रित करत आहेत.
इराणी लष्कराने यापूर्वीच जाहीर केले होते,
"आम्ही शेवटपर्यंत प्रतिकार करू आणि या प्रदेशातील अमेरिकन हस्तक्षेप निष्फळ ठरवू."
इराणच्या लष्करी प्रवक्त्याने असेही म्हटले की होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अमेरिकेने जून महिन्यात दोन्ही देशांमध्ये झालेल्या १४ कलमी सामंजस्य कराराची अंमलबजावणी करणे आणि इराणने जहाज वाहतुकीसाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे.
ट्रम्प यांना इराणचा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इशारा दिला होता की इराणने पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या नाहीत, तर पुढील आठवड्यात त्यांच्या वीज केंद्रांवर आणि पुलांवर हल्ले केले जातील.
यावर अक्रमिनिया यांनी सांगितले की, जर ट्रम्प यांनी ही धमकी प्रत्यक्षात आणली, तर इराणचे सशस्त्र दल संपूर्ण आखाती प्रदेशातील उर्वरित सर्व पायाभूत सुविधांवर हल्ले करतील. हा प्रतिसाद आधीच्या हल्ल्यांपेक्षा अधिक तीव्र, व्यापक आणि विनाशकारी असेल.
शेजारी देशांनाही इशारा
इराणने गुरुवारी दावा केला की त्यांनी कुवेत आणि जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले.
इराणने आपल्या शेजारी देशांना इशारा देत म्हटले,"अमेरिकेला आपल्या भूमीचा वापर करून इराणवर हल्ला करण्यासाठी तळ उपलब्ध करून देणे आम्हाला मान्य नाही. अशा कृतीला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल."
गुरुवारी पहाटे बहरीनमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले, तर कुवेतने शत्रूच्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देत असल्याचे सांगितले.
इराणच्या लष्कराने दावा केला की त्यांनी जॉर्डनमधील अल-अझ्राक हवाई तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.
तसेच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दावा केला की त्यांनी कुवेतमधील अली अल-सालेम हवाई तळावरील उपग्रह संचार केंद्र, पूर्वसूचना रडार आणि अल-शुआइबा येथील अमेरिकन लष्करी धक्का (पिअर) नष्ट केला.
बहरीनच्या संरक्षण मंत्रालयाने मात्र सांगितले की त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इराणकडून आलेले अनेक हवाई हल्ले अडवून नष्ट केले.
संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता
या नव्या संघर्षामुळे मध्यपूर्वेत पुन्हा पूर्ण स्वरूपाचे युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली आहे.
विश्लेषकांचे म्हणणे आहे की इराण येमेनमधील हूथी सहयोगींचा वापर करून बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न करू शकतो. तसे झाल्यास जगातील तेल आणि वायू पुरवठ्याचे दोन महत्त्वाचे समुद्री मार्ग धोक्यात येऊ शकतात.
या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोक विस्थापित झाले आहेत. विशेषतः इराण आणि लेबनॉनमध्ये, जिथे इस्रायल आणि इराणसमर्थित हिझबुल्ला यांच्यातील संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे.
