!-- afp header code starts here --> पिंपरी चिंचवड मध्ये मोशी कचरा डेपो दुर्घटना: कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत जमीनदोस्त; १६ जण अडकल्याची भीती

पिंपरी चिंचवड मध्ये मोशी कचरा डेपो दुर्घटना: कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत जमीनदोस्त; १६ जण अडकल्याची भीती


महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो येथे मोठी दुर्घटना घडली आहे. कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून तीन मजली प्रशासकीय इमारत जमीनदोस्त झाली असून, सुमारे 16 कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने 7 कामगारांना सुखरूप ढिगाऱ्यामधून बाहेर काढले आहे. ही इमारत महापालिकेच्या वतीने कचरा प्रक्रिया करणाऱ्या खासगी कंपनीची प्रशासकीय इमारत होती. प्राथमिक माहितीनुसार, सततच्या मुसळधार पावसामुळे 'लेगसी वेस्ट'चा मोठा ढिगारा सैल झाला आणि तो इमारतीवर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, दुर्घटनेच्या वेळी इमारतीत सुमारे १६ कर्मचारी उपस्थित असल्याची शक्यता आहे. बचावासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनीही मुसळधार पावसामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्याची दरड कोसळल्याचे सांगितले असून, जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली आहे. 

सर्व कामगारांना वाचवण्यासाठी मोठी यंत्रणा काम करत आहे. अद्यापही जीवित हानी झाल्याचे अथवा कोणी गंभीर जखमी झाल्याचे अधिकृत वृत्त प्रशासना कडून जाहीर करण्यात आलेले नाही.


थोडे नवीन जरा जुने