सुमारे १,५०० नागरिकांची बोटीच्या सहाय्याने सुटका; ५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, ७५० जनावरेही वाचविली
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या मदत व बचावकार्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. शहरातील विविध भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांसह जनावरांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हे बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यात आले.
अतिवृष्टीमुळे रहाटणी, केशवनगर, ताथवडे, किवळे, रावेत, मोशी, चिखली, रमाबाई नगर, भाट नगर, आंबेडकर नगर, नढे नगर, पिंपळे गुरव, नवी सांगवी, भोसरीतील कुंदननगर तसेच शहरातील अन्य पूरग्रस्त अशा सुमारे २० ते २५ भागांमध्ये नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. या ठिकाणी अग्निशमन विभागाच्या जवानांनी बोटींच्या सहाय्याने सुमारे १,५०० नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले.
याशिवाय, चिंचवड येथील केशवनगर परिसरातील गुरुकुलमध्ये अडकलेल्या तब्बल ३०० विद्यार्थ्यांचे यशस्वी बचावकार्य करून त्यांना सुरक्षित निवारा केंद्रात हलविण्यात आले. नदीकाठच्या मंदिरांमध्ये वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे अडकलेल्या पुजाऱ्यांचीही सुखरूप सुटका करण्यात आली. ताथवडे परिसरात अडकलेल्या वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून निवारा केंद्रात हलविण्यात आले. काळेवाडी येथे गर्भवती महिला, लहान मुले तसेच अनेक वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले, तर जुनी सांगवी परिसरात पूराच्या पाण्यात अडकलेल्या आई आणि तिच्या बाळाची धाडसीपणे सुखरूप सुटका करण्यात आली.
पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या एकूण सुमारे ५,००० नागरिकांना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून, तेथे त्यांच्यासाठी भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा तसेच इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांप्रमाणेच अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या गाई, म्हशी आदी सुमारे ७५० जनावरांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व १० अग्निशमन केंद्रांवरील अधिकारी, जवान आणि नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय, तत्परता आणि धाडसाच्या बळावर ही आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळली. या संपूर्ण बचाव मोहिमेत उप अग्निशमन अधिकारी अनिल टिंबळे, दिलीप गायकवाड, सुनील फरांदे, श्रीकांत वैरागर, गौतम इंगवले, चंद्रशेखर घुले यांच्यासह लिडिंग फायरमन अनिल कदम, वरिष्ठ फायरमन चेतन माने तसेच फायरमन सुमित कांबळे, शुभम किरवे, दर्शन सोनवणे, संतोष सरोटे, नामदेव वाघे, ड्रायव्हर-ऑपरेटर अमोल चिपळुनकर आणि इतर अग्निशमन जवानांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
तसेच नियंत्रण कक्षामध्ये २४ तास कार्यरत राहून आपत्कालीन कॉल स्वीकारणे, माहितीचे समन्वयन करणे आणि बचाव पथकांशी सातत्याने संपर्क ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पूजा वलगुडे, करूणा थोया, तेजस्वी पाटील आणि स्नेहा जगताप यांनी यशस्वीपणे पार पाडली. सध्या देखील शहरातील पूरग्रस्त भागांमध्ये अग्निशमन विभागाचे बचावकार्य सुरू असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे, पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढणे तसेच आवश्यक ती मदत पुरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी २४x७ सज्ज असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाशी तात्काळ संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
