!-- afp header code starts here --> नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महापालिका युद्धपातळीवर कार्यरत – महापौर रवि लांडगे

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महापालिका युद्धपातळीवर कार्यरत – महापौर रवि लांडगे

पिंपरी चिंचवड : शहरात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महापौर रवि लांडगे यांनी आज दिवसभर विविध पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या तसेच कोणत्याही नागरिकाला अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. 

महापौरांनी सर्वप्रथम चिखली प्राधिकरण परिसरातील घरकुल येथे भेट देऊन पाण्यात उतरून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, नागरिकांच्या भावना जाणून घेत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांसह लवकरच संयुक्त बैठक घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी आणि परिणामकारक तोडगा काढण्यासाठी कडक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक कुंदन गायकवाड, योगिता नागरगोजे, सचिन सानप, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. 

त्यानंतर महापौरांनी चिखली येथील महानगरपालिका शाळेत स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची भेट घेतली. प्रत्येक कुटुंबाची विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शाळेतील निवास व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन, औषधोपचार तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत का, याची त्यांनी स्वतः पाहणी केली. नागरिकांच्या सन्मानाला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी नगरसेवक सोनम मोरे, विकास साने, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. 

यावेळी महापौर म्हणाले, “आपत्तीच्या काळात प्रशासन ही केवळ यंत्रणा नसून नागरिकांचा आधार असते. संकटाच्या या काळात प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका खंबीरपणे उभी आहे. कोणालाही एकटे सोडले जाणार नाही.” यानंतर महापौरांनी चिखली परिसरातील इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीची पाहणी केली.

थोडे नवीन जरा जुने