– कृष्णानगर प्रभागातील सावित्रीबाई फुले महापालिका शाळेसमोरील ड्रेनेज गळतीचा प्रश्न कायम; नागरिकांत तीव्र संताप
वार्ताहर : शिवानंद चौगुले | महाराष्ट्र जनभूमी न्यूज
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कृष्णानगर प्रभाग क्रमांक ११, पेठ क्रमांक २० कृष्णा नगर मधील सावित्रीबाई फुले महापालिका शाळेसमोर गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज गळतीमुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे अत्यंत गंभीर चित्र समोर आले आहे. दररोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना या घाण पाण्यातून मार्ग काढावा लागत असून, त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाकडून वेळोवेळी तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत असली तरी काही दिवसांतच पुन्हा त्याच ठिकाणी गळती सुरू होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शाळा सुरू होण्याच्या आणि सुट्टीच्या वेळेत विद्यार्थ्यांची मोठी गर्दी या परिसरात असते. पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकत्र मिसळल्याने संपूर्ण परिसर दुर्गंधीयुक्त बनतो. अनेक लहान मुले या पाण्यातून चालत शाळेत जात असल्याचे चित्र अत्यंत वेदनादायी आहे. दूषित पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, त्वचारोग आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती पालक व्यक्त करीत आहेत.
विशेष म्हणजे, सावित्रीबाई फुले महापालिका शाळा ही पिंपरी-चिंचवड शहरातील उत्कृष्ट आणि पुरस्कारप्राप्त शाळांपैकी एक मानली जाते. या शाळेने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि गुणवत्ता विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, महानगरपालिकेचे आयुक्त तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शाळेला भेट देऊन तिच्या कार्याचा गौरव केला आहे. मात्र, अशा गौरवशाली शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच विद्यार्थ्यांना सांडपाण्यातून जावे लागत असेल, तर ही बाब महापालिकेसाठी निश्चितच चिंताजनक आणि दुर्दैवी आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, या समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात. मूळ कारण शोधून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही समस्या वारंवार निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास कमी होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांना आवाहन केले आहे की, शहरातील सर्व महापालिका शाळांच्या परिसराची नियमित पाहणी, ड्रेनेज व पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी, तसेच स्वच्छता व देखभाल यासाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी कृती आराखडा तयार करण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड न करता तातडीने ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.
विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी वातावरणात शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे कृष्णानगर प्रभागातील सावित्रीबाई फुले महापालिका शाळेसमोरील ड्रेनेज गळतीचा प्रश्न तातडीने कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी मागणी पालक, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे. महापालिका प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
