पुणे (वर्षा चव्हाण) : अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने पुणे व सोलापूर येथे धडक कारवाई करत विना लेबल व भेसळीच्या संशयावरून तुप व नमकीनचा साठा जप्त केला. या कारवाईत पिंपळे गुरव येथील एका आस्थापनेचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पिंपळे गुरव येथील मे. देवांश मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या आस्थापनेची तपासणी केली असता २३० किलो तुपाचा सुमारे ९० हजार ५०० रुपयांचा विना लेबल व भेसळीच्या संशयित साठा आढळून आला. तपासणीदरम्यान आढळलेल्या गंभीर त्रुटींची दखल घेत ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती शि. ग. घाटोळ यांनी श्री. सा. सु. पटवर्धन, श्री. अक्षय शेळके यांच्या पथकासह सहायक आयुक्त (अन्न) विश्वजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
दरम्यान, पुणे विभागातील सोलापूर कार्यालयाने मे. संगीता फूड प्रॉडक्ट्स, मड्डे वस्ती, सोलापूर येथे तपासणी करून लेबलमधील त्रुटी व भेसळीच्या संशयावरून १६० किलो नमकीनचा सुमारे ३२ हजार रुपयांचा साठा जप्त केला. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती कि. घ. देशमुख यांनी केली.
विनापरवाना अथवा नियमबाह्य पद्धतीने अन्न व्यवसाय करणाऱ्या तसेच दर्जाहीन, भेसळयुक्त अथवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती सहआयुक्त (अन्न) दि. वा. भोगावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
