भारत टॅक्सीमध्ये टू-व्हीलर टॅक्सी नको; महाराष्ट्रातील ऑटो-टॅक्सी चालक-मालकांची ठाम भूमिका
भारत टॅक्सीचे स्वागत, परंतु टू-व्हीलर टॅक्सीला कायम विरोध
नवी मुंबई विमानतळ येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘भारत टॅक्सी’चा उद्घाटन सोहळा पार पडला. या महत्त्वाच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ऑटो-टॅक्सी चालकांच्या कोणत्याही प्रमुख संघटनांना आमंत्रित करण्यात आले नाही किंवा त्यांना विश्वासात घेतले गेले नाही.
ऑटो टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्र राज्याचे नेते आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, ‘भारत टॅक्सी को-ऑपरेटिव्ह’च्या माध्यमातून सरकार ऑटो-टॅक्सी चालकांच्या हिताला डावलून चुकीचा अजेंडा राबवत आहे. यात ‘टू-व्हीलर टॅक्सी’ (दुचाकी टॅक्सी) सुरू करण्याचे संकेतही मिळत आहेत. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून या मनमानी कारभाराचा आम्ही तीव्र निषेध करतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.
एका बाजूला ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या कंपन्यांनी ऑटो-टॅक्सी चालकांचे आर्थिक शोषण केले आहे. अशा परिस्थितीत गृहमंत्री अमित शाह यांनी शोषणमुक्त आणि हक्काचे मोबाईल अॅप म्हणून ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. या घोषणेचे ऑटो-टॅक्सी चालकांनी स्वागत केले होते. दिल्ली, गुजरात आणि पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्रातही ही सेवा सुरू झाली आहे. मात्र, ज्यांच्या भवितव्यासाठी आणि हितासाठी ही सेवा सुरू केली जात आहे, त्यांनाच या प्रक्रियेतून जाणीवपूर्वक वगळले जात आहे, हे संतापजनक आहे, असे डॉ. बाबा कांबळे यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबा कांबळे यांनी ठामपणे सांगितले की, भारत टॅक्सीच्या माध्यमातून टू-व्हीलर टॅक्सी सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे राज्यातील ३० लाखांहून अधिक ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या रोजी-रोटीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. भारत टॅक्सीचे आम्ही स्वागत करतो, मात्र त्यात टू-व्हीलर टॅक्सीला आमचा कायम व प्रखर विरोध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकार आणि भारत टॅक्सी प्रशासनाकडून सुरू असलेल्या या कारभारामुळे राज्यातील ३० लाख रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात आणि टू-व्हीलर टॅक्सीला विरोध दर्शवण्यासाठी लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील रणनीती आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी लवकरच राज्यव्यापी कृती समितीची तातडीची बैठक आयोजित केली जाणार असून, त्यामध्ये अधिकृत निर्णय जाहीर करण्यात येईल, असा इशाराही डॉ. बाबा कांबळे यांनी दिला आहे.
