पिंपरी चिंचवड – "आंदोलक म्हणजे आतंकवादी" असे वक्तव्य करून शेतकरी, कामगार आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करणाऱ्या लाखो आंदोलकांचा अपमान करणारे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी तातडीने माफी मागावी. अन्यथा त्यांना लवकरच काळे फासू असा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.
नखाते म्हणाले की, "आंदोलक म्हणजे आतंकवादी" हे विधान अत्यंत दुर्दैवी, लोकशाहीविरोधी आणि देशातील आंदोलनांच्या समृद्ध इतिहासालाच नाकारणारे आहे. विशेष म्हणजे हे वक्तव्य अशा व्यक्तीकडून आले आहे, ज्यांनी स्वतः ऊस उत्पादक शेतकरी, दूध उत्पादक, शेतीमालाला हमीभाव आणि कर्जमाफी यांसारख्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलने केली आहेत. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांतूनच सदाभाऊ खोत यांना राज्याच्या राजकारणात मोठी ओळख मिळाली आणि पुढे मंत्रीपदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. आंदोलनातूनच राजकीय उंची मिळालेल्या व्यक्तीने आज आंदोलकांनाच दहशतवादी म्हणणे ही कृतघ्नतेची परिसीमा असल्याची टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना त्यावर ठोस भूमिका न घेणारे सदाभाऊ खोत दिल्लीतील आंदोलनांवर मात्र टीका करतात, हे दुर्दैवी आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीपर्यंत देशातील अनेक ऐतिहासिक परिवर्तन आंदोलने करूनच घडली आहेत. त्यामुळे आंदोलकांना दहशतवादी म्हणणे म्हणजे संविधानिक मूल्यांचा आणि लोकशाहीचा अवमान आहे.
या वक्तव्याचा कष्टकरी संघर्ष महासंघाच्या व राज्यातील सर्व आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांच्यावतीने तीव्र निषेध करण्यात येत असून, सदाभाऊ खोत यांनी तातडीने जाहीर माफी मागावी. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यांना काळे फासून निषेध नोंदविला जाईल, असा इशाराही काशिनाथ नखाते यांनी दिला.
