कचरा वाहतूक करणाऱ्या धूर ओकणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
पिंपरी-चिंचवड (शिवानंद चौगुले) : पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेकडून कचरा संकलन व वाहतुकीसाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांतून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा वाहनांद्वारे वाहून नेला जातो. मात्र, या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची अवस्था आणि त्यातून होणाऱ्या प्रदूषणाकडे महापालिका प्रशासनासह प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) पुरेसे लक्ष आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दुर्गानगर चौक, यमुनानगर, निगडी येथे रविवारी सकाळी कचरा वाहतूक करणारे एक वाहन अत्यंत दयनीय अवस्थेतून रस्त्यावरून जात असल्याचे निदर्शनास आले. या वाहनातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असल्याचे दिसून आले. वाहनाची एकूण स्थिती, स्वच्छता आणि देखभाल पाहता अशा वाहनांची नियमित तपासणी केली जाते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कचरा वाहतूक करणाऱ्या काही वाहनांची नंबर प्लेट स्पष्टपणे दिसत नाही, वाहनांची वेळेवर देखभाल केली जात नसल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. काही वाहनांमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असल्याने शहरातील वाढत्या वायुप्रदूषणात अशा वाहनांचीही भर पडत असल्याची नागरिकांची भावना आहे. त्याचबरोबर या वाहनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून दिले जाते का, याचीही तपासणी होणे गरजेचे आहे.
महापालिकेच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह
कचरा वाहतुकीचे कंत्राट देणे एवढीच महापालिकेची जबाबदारी नसून, कंत्राटदारांकडून नियम व अटींचे पालन होते की नाही, याची नियमित पाहणी करणेही प्रशासनाची जबाबदारी आहे. वाहनांची यांत्रिक स्थिती, फिटनेस, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, स्वच्छता, नंबर प्लेट तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी महापालिकेने वेळोवेळी करणे अपेक्षित आहे.
महापालिका नागरिकांच्या करातून कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देते. त्यामुळे त्याबदल्यात नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि नियमबद्ध सेवा मिळणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्ष रस्त्यावर दिसणारी काही वाहनांची अवस्था पाहता या संपूर्ण व्यवस्थेच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरटीओच्या तपासणीवरही प्रश्न
कचरा वाहतूक करणारी वाहने पहाटे आणि सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात शहरातील रस्त्यांवर फिरत असतात. त्यामुळे नियमित रस्ते तपासणीदरम्यान ही वाहने आरटीओच्या निदर्शनास येतात का, हा प्रश्न आहे. त्याचबरोबर फिटनेस प्रमाणपत्रासाठी ही वाहने आरटीओकडे जात असताना त्यांची प्रत्यक्ष यांत्रिक स्थिती आणि प्रदूषणाची पातळी कोणत्या निकषांवर तपासली जाते, याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत.
फिटनेस प्रमाणपत्र असलेल्या वाहनाची प्रत्यक्ष रस्त्यावरची अवस्था आणि कागदावरील स्थिती यामध्ये तफावत आहे का, याची तपासणी करण्याची गरज आहे.
कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या देखभालीसाठी संबंधित कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करावी. निकृष्ट अवस्थेतील किंवा प्रदूषण करणारी वाहने आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच महापालिकेतील संबंधित अधिकारी वाहनांची नियमित तपासणी करतात की नाही, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मोठा खर्च केला जात असताना कचरा वाहतूक करणारीच वाहने जर धूर ओकत रस्त्यावर धावत असतील, तर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त शहराची संकल्पना कशी साकार होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
संयुक्त तपासणी मोहीम राबविण्याची गरज
महापालिका प्रशासन आणि आरटीओने संयुक्तपणे शहरातील सर्व कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवावी. वाहनांचे फिटनेस, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, नंबर प्लेट, यांत्रिक स्थिती, स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेली सुरक्षा व्यवस्था यांची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर तसेच संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हा प्रश्न केवळ एका वाहनाचा नसून संपूर्ण कचरा वाहतूक व्यवस्थेच्या कार्यक्षमतेचा आणि प्रशासनाच्या देखरेखीचा आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या विषयाकडे महापालिका आणि आरटीओ प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
— शिवानंद चौगुले
महाराष्ट्र जनभूमी न्यूज वार्ता
