ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासह २१०० रुपये देण्याची मागणी; महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून महिला सहभागी होणार
मुंबई / पिंपरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ आणि अपात्र ठरवलेल्या महिलांना पुन्हा योजनेत सहभागी करून घेण्याच्या मागणीसाठी मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे लाडक्या बहिणींचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या मोर्चात पिंपरी-चिंचवड, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने महिला सहभागी होणार असल्याची माहिती कष्टकरी संघर्ष महासंघाचे महिला पदाधिकारी यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून २ कोटी ४७ लाख लाभार्थींना लाभ दिला. आता सुमारे ८० लाख आधी आणि आता सुमारे १ कोटीपर्यंत लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. आर्थिक बोजाचे कारण पुढे करून पात्र व गरजू महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या मोर्चाची संयोजन माधुरी जलमुलवार, रुक्मिणी जाधव,अर्चना कांबळे,लक्ष्मी गायकवाड ,सविता करपे, सुनंदा लोंढे, अश्विनी मालुसरे, सुनीता दिलपाक,प्रियांका काटे,नंदा तेलगोटे, सुनीता पोतदार, माया शेटे, जरिता वाठोरे,स्वाती पालके, मनीषा हाके, शीतल धनगर ,नंदा जाधव,सिंधू जाधव,
विजया पाटील,वहिदा शेख, कमल लष्करे यांनी आयोजन केले आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार असून, शासनाने महिलांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
