पिंपरी चिंचवड - निगडीतील बीएसएनएल डक्टमध्ये २ तरुण कामगारांना जाणीपूर्वक रात्री बाराच्या नंतर कामाला लावण्यात आले त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला, वर्षभरानंतर पुन्हा दुसरी घटना घडली यात दोषी महानगरपालिका, बीएसएनएल अधिकारी, ठेकेदार या सर्वांवरती कडक कारवाई करा, मृतांच्या वारसांना ५० लाख रुपये अर्थसहाय्य द्या अन्यथा लवकरच आंदोलनाचा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.
कसम महाराष्ट्र तर्फे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, निगडी प्राधिकरण परिसरातील बीएसएनएल (BSNL) च्या भूमिगत इन्स्पेक्शन डक्टमध्ये कामासाठी उतरवलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. BSNL इन्स्पेक्शन डक्टमध्ये काही कामानिमित्त दोन तरुण कामगार उतरले होते. यात मनोज बाबुराव शिंदे वय २६ अमोल अशोक शिंदे वय २० यांचा मृत्यू झाला. सदर घटनास्थळी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी पदाधिकारी समवेत घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. डक्टमध्ये ऑक्सिजनची कमतरता, विषारी वायू किंवा अन्य कारणामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असण्याची शक्यता असली तरी मास्क, ऑक्सिजन व सुरक्षा साधनांचा वापर केला गेला नाही.
विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ याच ठिकाणी अशाच स्वरूपाची दुर्घटना घडली होती. यात लखन धावारे, दत्ता होणारे, साहेबराव गिरशेटे या तीन जणांचा मृत्यू झाला होता. याबाबत कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे २० ऑगस्ट रोजी बीएसएनएल कार्यालय चिंचवड येथे आंदोलन केले होते. आता घडलेल्या घटनेतील दोषीवर त्वरित कारवाई करावी अन्यथा लवकरच बीएसएनएल व महापालिका कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
