छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास आणि पुस्तका बाहेरील इतिहासाचा जिवंत अनुभव प्रेरणादायी ठरला.
पिंपरी चिंचवड - चिंचवड, महात्मा फुलेनगर येथील ओम शांती गंगा जेष्ठ नागरीक संघाची एकदिवसीय सहल काल शिवसृष्टी, कात्रज येथे आयोजित करण्यात आली होती. एक अविस्मरणीय अनुभव, शिवमय वातावरण आणि प्रत्येक गोष्टीचे भव्यदिव्य सादरीकरण यामुळे आपलेच गतवैभव पाहताना उर भरून येतो आणि डोळे भारावून जातात. आपले गड किल्ले, त्यांची रचना, त्यांचा इतिहास, शिवरायांचे स्वगत, त्यांनी आपल्याशी साधलेला संवाद, व्यक्त केलेल्या अपेक्षा, आग्ऱ्याहून सुटका, अंबाबाईचे 3D दर्शन, सगळं सगळंच एकदम बारकाईने सादरीकरण केले आहे ह्या थीम पार्क मध्ये शब्दात सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहण्याची, अनुभवण्याची मजा आणि थरार अवर्णनीय आहे.
भव्य दिव्य भवानी माता मंदिर म्हणजे शिवरायांची श्रद्धा व प्रेरणा मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला धार्मिक ऊर्जा आणि राष्ट्रभक्तीचा अनुभव देतो.
सध्या थीम पार्क अपूर्ण आहे तरी जे आहे तेदेखील भारावून टाकते. नियोजनाप्रमाणे पूर्णत्वास आल्यावर तर दैदिप्यमान वाटेल... खरंच ! प्रत्येकाने परिवारासमावेत किमान एकदा शिवसृष्टीला भेट जरूर द्यावी असे प्रत्येकाच्या मनात आले.
महाराजांच्या जीवनावर आधारीत प्रसंग, गड किल्ले यांच्या प्रतिकृती, अनेक पुतळे, चित्रफित पाहून शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास आपल्या मनात राष्ट्राभिमान शौर्य आणि सांस्कृतिक मूल्यांची बीजं रुजवणारा आहे. शिवसृष्टीची सहल खूपच प्रेरणादायी ठरला.
ऐतिहासिक सहल यशस्वी करण्यासाठी पी एम पी एल ने प्रवास करीत ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघाचे यशवंत कन्हेरे व शिवानंद चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले.