PCMC : मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे सोसायटीधारकांना दिलासा! सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांची प्रतिक्रिया

 


नाशिक फाटा ते खेड ट्रॅफिक कोंडीसाठी ठोस पाठपुरावा सुरू

पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड शहर तसेच हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाळ्यात वाढलेल्या ट्रॅफिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घेण्याची विनंती आमदार महेश लांडगे यांच्यामार्फत करण्यात आली होती. या विनंतीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यामुळे सोसायटीधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिली.

शहरातील नागरिक तसेच हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या नोकरदार वर्गाला दररोज तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. ही व्यथा आणि उपाय योजना मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विविध उपाय सुचवले गेले.

चांदणी चौक येथील ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आयआयटी मुंबईच्या मदतीने तयार केलेल्या अहवालाचा संदर्भ देत, त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडसाठीही वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेत सकारात्मक भूमिका घेत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. तसेच नाशिक महामार्गावरील चाकण, खेड, निगडी, चिखली, मोशी परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी रस्ता रुंदीकरणास प्राधान्य द्यावे, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.

प्रतिक्रिया

“महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच शहरातील स्वयंसेवी संस्थांना समस्येवर उपाययोजना व चर्चेसाठी बोलवण्यात आले. ही ऐतिहासिक घटना असून, आता नाशिक फाटा, देहू, आळंदी रोड, चिखली परिसरातील वाहतूक समस्यांवर ‘ॲक्शन प्लॅन’ तयार व्हावा, अशी अपेक्षा आहे.”

संजीवन सांगळे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन

थोडे नवीन जरा जुने